वसई : मुंबई पोलिसांनी कारवाई करत नालासोपारा येथे ड्रग्जचा अवैध ड्रग्जचा कारखाना उघडकीस आणला. या कारवाईनंतर स्थानिक पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी याना निलंबित करण्यात आले. या पूर्वीही मुंबई पोलिसांनी दोन वेळा वसईत अमली पदार्थविरोधी कारवाई केली होती.
पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या पेल्हार येथील गाळ्यात छुप्या पद्धतीने ड्रग्जचा कारखाना सुरु होता. हे प्रकरण उघडकीस येताच मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी त्वरित जितेंद्र वनकोटी यांना सेवेतून निलंबित केले.
हा कारखाना काही महिन्यांपूर्वीच सुरु झाला होता. याठिकणी लोकांना रासायनिक पदार्थ केले जात असल्याचे भासवून रात्री अमली पदार्थ बनविण्यात येत होते. रविवारी (२६ ऑक्टोबर ) गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक धाड टाकत नालासोपारा येथील रशीद कंपाऊंड मध्ये सुरु असलेला हा कारखाना उध्वस्त केला. यावेळी कारवाईत १४ कोटींचे मॅफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त केला गेला. याशिवाय हा पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि इतर काही अमली पदार्थ जप्त केले असून यांची किंमत १३ कोटी ४४ लाख ५३ हजार ७०० रुपये इतकी आहे.
या प्रकरणात एकूण पाच आरोपीना अटक करण्यात आली. यात चार ड्रग्ज विक्रेत्यांचा आणि एका उत्पादकाचा समावेश आहे. सोहेल अब्दुल ररुफ खान, मेहताब शेरअली खान, इकबाल बिलाल शेख, मोहसिन कयुम सैय्यद, आयुबअली अबुबकर सिद्दीकी अशी आरोपींची नावे आहेत
५ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांना माहिती मिळाली की एकजण कुर्ल्यात एमडी ड्रग्ज विकण्यासाठी येत आहे. तपास पथकाने त्याला अटक करून त्याच्याकडून ५७. ८४ ग्राम एमडी ड्रग्ज जप्त केले. तपासात आरोपीने इतर साथीदारांची नावे उघड केली . त्यानंतर नालासोपारा येथे पोलिसांनी रविवारी धाड टाकत ६. ६७५ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले.






