सातारा: साताऱ्यातील फलटण तालुक्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकार परिषद घेत दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी आणि पीडित डॉक्टर तरुणीचे मोबाइल तपासण्यात आले आहेत. डॉक्टर तरुणीचे दोन्ही आरोपींसोबत काहीतरी संबंध होते आणि ती नियमितपणे दोघांच्या संपर्कात होती. डॉक्टर तरुणीचे आरोपीसोबतचे चॅटही सापडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
साताऱ्यातील डॉक्टरची डायरी सापडली
या संदर्भात आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. डॉक्टर तरुणीला डायरी लिहिण्याची सवय होती. क्लास वन अधिकाऱ्यांना दैनंदिनी लिहिण्याची सवय असते. डॉक्टर तरुणीही त्या डायरीमध्ये पीएम नोट (पोस्टमॉर्टम नोट) लिहित होती. याशिवाय वैयक्तिक माहितीदेखील या डायरीत लिहित होती. त्यामुळे या डायरीमुळे मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.
डॉक्टर तरुणी ही फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती. फलटणशिवाय साताऱ्यातील इतर ठिकाणीही वैद्यकीय अधिकारी म्हणून तिने काम पाहिलं.
पोस्टमॉर्टम नोटची आवश्यकता काय असते?
पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर पीएम नोट लिहित असतात. सध्या ही पद्धत दुर्मीळ झाली आहे. मात्र बदली झाल्यानंतर डॉक्टरांना आधीच्या पोस्टमॉर्टमची माहिती असावी यासाठी ही नोट लिहिली जाते. पीडित डॉक्टर तरुणी नियमितपणे पीएम नोट लिहून ठेवत होती. त्यामुळे यातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खोट्या पीएम रिपोर्टसाठी दबाव...
महिला डॉक्टरच्या भावाने अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. पीडित महिला डॉक्टरवर खोटे पीएम रिपोर्ट देण्यासाठी पोलिसांकडून दबाव आणला जात होता. तिने अनेकदा याबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही राजकीय आणि पोलिसांकडून तिच्यावर दबाव आणला जात होता असा आरोप करण्यात आला आहे. हे आरोप पाहाता साताऱ्यातील मृत महिला डॉक्टरच्या डायरीमुळे मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.






