Wednesday, November 19, 2025

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) ८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली आहे.

शासनमान्य शाळांमधून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ट होण्यासाठी तसेच इयत्ता आठवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही परीक्षा ८ फेब्रुवारी, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल.

या परीक्षेसाठी प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी असे चार विषय असून एकूण ३०० गुणांची ही परीक्षा असेल. या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह २७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र आणि शुल्क ऑनलाईन भरता येईल. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज करता येईल.

विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तसेच विद्यार्थी शासनमान्य शासकीय/ अनुदानित/ विनाअनुदानित/ कायम विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इ. पाचवी किंवा इ. आठवी मध्ये शिकत असणे आवश्यक आहे. ही परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगु आणि कन्नड या सात माध्यमांमध्ये घेतली जाईल. इयत्ता पाचवीतील परीक्षेसाठी सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे वय ११ वर्षे तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १५ वर्षे, त्याचप्रमाणे इयत्ता आठवीतील परीक्षेसाठी सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे वय १४ वर्षे तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >