Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

तीव्र प्रकाशात झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका तब्बल ५६ टक्क्यांनी अधिक

तीव्र प्रकाशात झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका तब्बल ५६ टक्क्यांनी अधिक

नवी दिल्ली : रात्री झोपताना खोलीत असणारा तेजस्वी प्रकाश केवळ झोपेवरच नव्हे, तर हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम करू शकतो, असा इशारा एका नव्या वैज्ञानिक अभ्यासातून देण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, रात्रीच्या वेळी उजेडात झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका तब्बल ५६ टक्क्यांनी अधिक असतो.

संशोधकांनी हजारो लोकांच्या झोपेच्या सवयी आणि आरोग्याचा अभ्यास केला. त्यात असे आढळले की, जे लोक रात्री झोपताना खोलीत दिवा, टीव्ही किंवा इतर कोणत्याही प्रकारचा तेजस्वी प्रकाश चालू ठेवतात, त्यांना हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. रात्रीचा प्रकाश शरीरातील नैसर्गिक जैविक घड्याळ बिघडवतो. यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते, रक्तदाब वाढतो आणि शरीरातील इतर महत्त्वाच्या क्रियांवरही परिणाम होतो. त्यामुळेच हृदयविकार आणि इतर गंभीर आजार टाळण्यासाठी रात्री झोपताना पूर्ण अंधारात झोपण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

यावर उपाय म्हणून झोपताना दिवे बंद ठेवावेत, झोपेच्या खोलीत पडदे लावावेत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर कमी करावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शहरी भागात रात्रीच्या वेळी रस्त्यांवरील दिवे, घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर झगमगाटामुळे नागरिक सतत प्रकाशाच्या संपर्कात असतात. त्यामुळे या भागातील लोकांना हृदयविकाराचा धोका अधिक असल्याचे अभ्यासकांचे निरीक्षण आहे. नागरिकांनी आपल्या झोपेच्या सवयींमध्ये बदल करून आरोग्याची काळजी घ्यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.

Comments
Add Comment