Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

पाकिस्तान–अफगाणिस्तान तणाव पुन्हा वाढला: तालिबानकडून इस्लामाबादवर हल्ल्याची तयारी

पाकिस्तान–अफगाणिस्तान तणाव पुन्हा वाढला: तालिबानकडून इस्लामाबादवर हल्ल्याची तयारी

Pakistan Afghan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा धोक्याच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या सीमारेषेवर झालेल्या संघर्षात अनेक सैनिक आणि नागरिक मृत्युमुखी पडले होते. त्या घटनेनंतर निर्माण झालेला तणाव अद्याप शमलेला नाही. उलट अफगाणिस्तानकडून आता अधिक आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने पुन्हा एकदा हल्ला केल्यास तालिबानकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. एवढेच नव्हे, तर पाकिस्तानने अफगाण भूमीवर बॉम्बहल्ले केल्यास इस्लामाबादवर थेट हल्ला करण्याची तयारी सुरू असल्याचेही संकेत मिळाले आहेत.

अफगाणिस्तानकडून शांततेसाठी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तालिबानने वाटाघाटीसाठी सकारात्मक भूमिका घेतली होती, परंतु पाकिस्तानी प्रतिनिधींनी सहकार्य न केल्याचा आरोप अफगाणी बाजूने करण्यात आला आहे. इस्तंबूल येथे झालेल्या बैठकीदरम्यान काही पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी चर्चेत अडथळे निर्माण केल्याने संवाद कोलमडला. परिणामी, अफगाणिस्तानकडून आता या वादाकडे थेट संघर्ष म्हणून पाहिले जात आहे.

अलीकडेच पाकिस्तानने अफगाण सीमेजवळ हवाई हल्ला करून काही तालिबानी आणि नागरिकांचा जीव घेतला. या कारवाईनंतर दोन्ही देशांमध्ये परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या गोळीबारात दोन्ही देशांच्या सैनिकांसह काही दहशतवादीही ठार झाले. तालिबानने काही पाकिस्तानी जवानांना ओलीस ठेवल्याचेही वृत्त समोर आले होते. मात्र, कतार आणि तुर्की यांच्या मध्यस्थीने १९ ऑक्टोबर रोजी तात्पुरत्या युद्धविरामावर सहमती झाली होती.

संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अलीकडेच दिलेल्या विधानात म्हटले की, जर दोन्ही देशांमधील संवाद निष्फळ ठरला, तर परिस्थिती युद्धाच्या दिशेने जाऊ शकते. त्यांच्या या विधानानंतर दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढला आहे.

पाकिस्तानकडून वारंवार तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांना पाकिस्तानविरोधी कारवायांसाठी मदत करतो असा आरोप करण्यात येतोय, मात्र तालिबानने हा आरोप फेटाळून लावला आहे.

या घडामोडींमुळे दक्षिण आशियातील स्थैर्याला पुन्हा धोका निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमध्ये वाढत चाललेला तणाव शेजारी देशांनाही चिंतेत टाकणारा ठरत आहे, आणि या संघर्षाचे रूपांतर युद्धात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >