इंदूरमध्ये भररस्त्यात दोन ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंना झालेल्या छेडछाडीची दखल फार कुठे गांभीर्याने घेतली गेल्याचं दिसत नाही. कप्पेबंद विचार करण्याच्या आपल्या सवयीमुळे आणि माध्यमांतही विषयवार बंद कप्पे असल्याने असं घडलं असावं. छेडछाड क्रिकेटपटूंची असल्याने सामाजिक - राजकीय विषय हाताळणाऱ्यांच्या दृष्टीने हा विषय क्रीडा क्षेत्राशी संबंधित झाला आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित लिखाण करणाऱ्यांच्या दृष्टीने हा विषय स्त्री अत्याचाराचा, म्हणजे सामाजिक ठरला असावा! त्यामुळे, या विषयाची ना हवी तशी दखल घेतली गेली, ना या घटनेचं गांभीर्य नीट अधोरेखित झालं. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या वेगवेगळ्या वायद्यांनी एकूणच भारतीय सध्या 'सातवें आसमाँ पर' आहेत, असा सगळ्या जगाचा समज झाला आहे. त्यात विविध देशांत दोन-तीन पिढ्या घालवलेल्या भारतीय कुटुंबातील व्यक्ती त्या-त्या देशात वेगवेगळ्या क्षेत्रांत उच्च स्थानी येऊ लागल्या आहेत. त्या प्रत्येक व्यक्तींचा भारतीयांना इतका गर्व वाटतो, की त्यांच्या वर्णनासाठी भारतीयांनी 'भारतीय वंश' नांवाचा नवा वंशच जन्माला घातला आहे!! या सगळ्यांसाठी आपण समाजमाध्यमांवर जो आनंद व्यक्त करतो, तो अनेकदा उन्मादी वाटू लागतो. त्यातून विविध देशांत भारतीयांच्या विरोधात रोष उफाळून येऊ लागला आहे. भारत सरकारने विशेष मोहीम आखून त्यावर काही उपाययोजना करायला हवी. ज्या भारतीयांना जागतिक ओळख आहे, त्यांनी भारतीयांची प्रतिमा सावरायला हवी. ते राहायला बाजूला, उलट इंदूरसारख्या घटना या सगळ्या भारतविरोधी वातावरणात तेल ओतायला कारण ठरतात. भारतात सार्वजनिक जीवन महिलांसाठी फारसं सुरक्षित नाही, असा सल्ला अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आदी देश आपापल्या देशातल्या पर्यटकांना देतच असतात. इंदूरमध्ये घडलेल्या घटनेने या पाश्चिमात्य देशांच्या पोकळ आरोपांना विनाकारण पुष्टी मिळते. अपवादात्मक स्वरूपात घडणाऱ्या अशा घटना म्हणजे जणू इथे नियमच आहे, असं वातावरण तयार करायला टपलेल्यांना हाती आयतं कोलीत मिळतं.
भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची नवी ओळख स्वतःच्या नव्या सामर्थ्यासह प्रस्थापित करू पाहतो आहे, हे खरंच आहे. आपली अशी ओळख निर्माण करण्यासाठी भारत क्रीडा क्षेत्रातही नवनव्या जबाबदाऱ्या घेण्याच्या तयारीत आहे. रस्त्यावर घडलेल्या एका छोट्याशा घटनेने अशा तयारीत गतिरोध निर्माण होऊ शकतात. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू म्हणजे काही साध्या पर्यटक नव्हेत. त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा आहे. अशा खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी काही नियम आहेत. त्या नियमांना छेद देऊनही जर छेडछाडीच्या घटना घडू शकत असतील, तर आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू भारतात येण्यापूर्वी चारदा विचार करतीलच ना! त्यांना पाठवणारे देशही भारताकडून अपमानास्पद हमीपत्रं लिहून घेतील किंवा सुरक्षेच्या व्यवस्थेची लेखी माहिती पुन्हा पुन्हा मागून घेतील! २०३० मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात, अहमदाबादला आयोजित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. २०३६ च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमान पद स्वीकारण्यास भारत उत्सुक आहे. पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा भारतात व्हाव्यात यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्या प्रक्रियेला अशा घटनांनी काहीशी खीळ बसते किंवा देश म्हणून वेगवेगळी स्पष्टीकरणं द्यावी लागतात, खात्री द्यावी लागते. एक देश म्हणून आपल्या सगळ्यांसाठी ही शरमेची बाब आहे. भारतीय समाजमनाला तशी जाणीव होणं महत्त्वाचं आहे. माध्यम आणि समाज माध्यमांतून त्याचं प्रतिबिंब तसं दिसायला हवं होतं. दुर्दैवाने ते दिसत नाही, हीच खंत आहे. समाज म्हणून आपण एक नाही. त्यामुळे, अशा घटनांची टोचणी जशी लागायला हवी, तशी आपल्याला लागत नाही. त्यातलं गांभीर्यही समजत नाही. ज्याने केलं, तो ज्या जाती - धर्माचा असेल; जिथे घडलं, ते शहर - राज्य जिथे कुठे असेल; तिथे तसं घडू शकतंच, ती 'त्यांची' जबाबदारी आहे, अशी भावना आपल्या मनात असते. 'आपण' त्यात कुठे नाही, 'आपला' त्याच्याशी काही संबंध नाही, ही 'आपली' धारणा असते. जगालाही माहीत नसतं. त्यांच्यादृष्टीने भारत आणि भारतीय सगळ एकच असतं. 'बाहेरच्यांची' ही दृष्टी 'आपली' होईल, तो सुदिन. तसं होईल, तेव्हांच इथे काही फरक पडेल, काही सुधारणा होतील. प्रश्न आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पाहुण्या क्रिकेटपटूंचा नाही. महिलांच्या सुरक्षिततेचा आहे. तो इथल्या महिलांच्या सुरक्षिततेचाही आहे. इथल्या महिलांची सुरक्षितताच महत्त्वाची वाटत नसेल, तर पाहुण्या महिलांची सुरक्षितता महत्त्वाची कशी वाटेल? त्यामुळे, आपल्या महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकस झाल्याशिवाय परदेशातून येणाऱ्या महिलांकडे निरोगी दृष्टीने कसं बघणार? हा देश किती विविधतेने नटलेला आहे! पण, तरीही आपल्याकडे जागतिक पर्यटकांचा ओघ हवा त्या प्रमाणात नाही. गेल्यावर्षी आपल्याकडे ९.९ दशलक्ष परदेशी पाहुणे आले. आपल्यापेक्षा कितीतरी लहान असलेल्या थायलंडमध्ये ही संख्या ३५.५ दशलक्ष होती. पर्यटनातून मिळणाऱ्या रोजगाराच्या कितीतरी संधी, परकीय चलन, जगात भारताची प्रतिमा सुधारण्याची संधी आपण दर दिवशी गमावत आहोत. इंदूरमध्ये घडलेल्या त्या प्रकाराची चर्चा केली, तर त्यातून भारताची प्रतिमा आणखी डागाळेल. त्यामुळे, त्याची दखलही नको आणि शक्यतो चर्चाही नको, असा कोणाचा समज असेल, तर तो भाबडा म्हणावा लागेल. कारण, परदेशी प्रसिद्धीमाध्यमांनी त्यांच्या पद्धतीने याची जी दखल घ्यायची, ती घेतलीच आहे. नव्या जगात सर्व देशातल्या माध्यमांवर सर्व देशातल्या माध्यमकर्मींचं, धोरणकर्त्यांचं, अभ्यासकांचं बारीक लक्ष असतं. सार्वजनिक ठिकाणी, दिवसाढवळ्या महिलेची अवहेलना होते आणि त्याबाबत आपल्याला फार काही वाटत नाही, असा बाहेरच्यांचा समज होणं आपल्यासाठी अधिक घातक आहे. या देशाला महासत्ता बनवण्याचं कंत्राट आपण कोणाला तरी दिलं आहे; त्यात आपल्यावर काही जबाबदारी नाही, असा इथला रस्त्यावरच्या माणसाचा समज असेल, तर तो लवकरात लवकर दूर झालेला बरा. इंदूरसारख्या घटना त्यामुळे टळतील.