इतर क्षेत्रांप्रमाणेच शिक्षणक्षेत्रातही माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून एक प्रकारची क्रांती अनुभवायला मिळत आहे. तांत्रिक विषयांसह इतरही सर्वच विद्याशाखांच्या अभ्यासकांना माहिती तंत्रज्ञानाने विविध प्रकारे सहाय्य केले आहे. खेरीज इलेक्ट्रॉनिक संवादमाध्यमे वापरून शाळा-कॉलेजांमध्ये दिल्या जाणाऱ्या पारंपरिक शिक्षणातही बदल घडले असून दूरशिक्षणासारखे मार्ग आता प्रत्येकाच्या आवाक्यात आले आहेत.
- डॉ. दीपक शिकारपूर
नव्या युगात शिक्षणक्षेत्रामध्ये नवतंत्रज्ञानाचे महत्त्व वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे हा बदल ग्रामीण भागातही पाहायला मिळत असून माहिती तंत्रज्ञानाने शिक्षणाच्या क्षेत्रात घडवून आणलेली क्रांती आपण सर्वजण पाहत आहोत. तांत्रिक विषयांसह इतरही सर्वच विद्याशाखांच्या अभ्यासकांना माहिती तंत्रज्ञानाने विविध प्रकारे सहाय्य केले आहे. खेरीज इलेक्ट्रॉनिक संवाद माध्यमे वापरून शाळा-कॉलेजांमध्ये दिल्या जाणाऱ्या पारंपरिक शिक्षणातही बदल घडले असून दूरशिक्षणासारखे मार्ग आता प्रत्येकाच्या आवाक्यात आले आहेत. ताज्या निष्कर्षानुसार सर्वाधिक तरुण लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक खूपच वरचा आहे. अर्थातच देश प्रगतिपथावर ठेवण्यासाठी आणि वैयक्तिक जीवनमान उंचावण्यासाठी तरुणाईला योग्य शिक्षण-प्रशिक्षण देण्याची मोठी गरज आहे. तरुणाईला विकास हवा आसल्याचे त्यांनी विविध मार्गाने स्पष्ट केले आहे.
आजच्या शाळकरी तसेच कॉलेजवयीन विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा आहे; परंतु आतापर्यंतच्या धोरणांमुळे म्हणा वा अन्य कारणांनी म्हणा, त्यांना पुरेशी संसाधने पुरवण्यात यंत्रणा नेहमीच कमी पडली आहे. बरे रस्ते, अन्नपाणी, कपडे, वह्या-पुस्तके, घरातील परिस्थिती आणि आसपासचे वातावरण आदी सामाजिक-आर्थिक बाबींमध्ये अपूर्णत्व असूनही छोटी मुले-मुलीदेखील चार-चार मैल चालून शाळेत जाताना आपण पाहतो आणि हळहळतो, कारण सर्व संसाधने पुरवणे कधी कधी प्रशासनालाही अवघड असते. दुसरीकडे, बहुसंख्य विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या आणि खासगी शाळांमध्ये जातात, असा अनेकांचा समज असतो. काही अंशी हे खरे आहे. पण हे चित्र शहरी आणि तुलनेने संपन्न ग्रामीण भागात बघायला मिळते, हे विसरून चालणार नाही. आजही सर्वाधिक विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये शिकतात आणि इतक्या व्यापक प्रमाणावर अशा प्रकारे शिक्षण पुरवणारी भारतातील सरकारी यंत्रणा जगात सर्वात मोठी आहे. मात्र इतक्या विस्तृत आणि सुस्थापित शैक्षणिक जाळ्यांचा वापर दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केला जात नाही हे आपल्या यंत्रणेचे अपयश म्हणजे देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल.
या पार्श्वभूमीवर इंटरनेटने कशी क्रांती घडवली आहे ते पाहणे गरजेचे ठरते. ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या विद्यार्थ्याला एखाद्या अभ्यासक्रमाची माहिती हवी असेल तर अगदी अलीकडेपर्यंत तो मिळेल त्या वाहनाने किंवा खरे तर बरेचदा चक्क चालतच तालुक्याचे गाव गाठत असे. तिथे एखादी चांगली शिक्षणसंस्था असेल तर ठीक, नाही तर पुन्हा प्रवास करून तो जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा शहरात येईल. संबंधित संस्थेचा पत्ता शोधून कार्यालयातून माहिती मिळवण्यात त्याचे दोन-तीन दिवस सहज जात. एवढ्या उद्योगानंतर त्याला योग्य ती माहिती मिळाली असेल तर ठीक, अन्यथा अजून कळले नाही, नोटीस निघालेली नाही, चार दिवसांनी फोन करा किंवा येऊन बोर्डावर पाहा असे उत्तर मिळाले की पुन्हा पुढच्या आठवड्यात हीच यात्रा काढण्याखेरीज पर्याय नसायचा. हा विद्यार्थी एकट्याने प्रवास करण्याइतका मोठा नसेल तर सोबतीला वडील, काका-मामा अशांना जावे लागायचे. म्हणजे दुप्पट खर्च आणि तेवढीच यातायात. इथे मुलींची म्हणजे विद्यार्थिनींची परिस्थिती तर आणखी बिकट व्हायची. मुलींनी शिकायचेच कशाला, मुलीच्या शिक्षणावर खर्च करून आमचा फायदा काय असे प्रश्न आपल्याकडे अजूनही विचारले जात असल्याने तिची पुढची शैक्षणिक वाट तर बहुधा बंदच होऊन जाते. मात्र अशा सरस्वतीच्या लेकीच्या आयुष्यात इंतरनेट महत्त्वाची क्रांती घडवू शकते, हे आता सर्वांना समजले आहे.विषयाचे चांगले आकलन होण्यासाठी किंवा तो अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण शिक्षणाचे दोन भाग करू या. शालांत परीक्षेपर्यंतचे आणि त्यानंतरचे, असे हे दोन भाग करता येतील. नंतरच्या शिक्षणामध्ये अधिक पर्याय असल्यामुळे समजून घेऊन त्यानुसार कृती करण्यात आणि विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची दिशा ठरवण्यात माहिती तंत्रज्ञान मोठी भूमिका बजावते. शिक्षा अभियानासंबंधी माहिती देणाऱ्या या वेबसाइट्स वापरून एखाद्या राज्यातील एखाद्या तालुक्यामध्ये कोणत्या शाळा, कोणत्या गावात आहेत हे शोधता येते. आयुष्यात एका टप्प्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षण सोडावे लागते ते त्यासाठी येणाऱ्या खर्चामुळे. सध्या उच्चशिक्षण, तर भयंकर महाग होत चालले आहे. अशा वेळी पात्र आणि हुशार विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्त्या अर्थात स्कॉलरशिप्स पुरवणाऱ्या असंख्य व्यक्ती आणि संस्था आहेत. इंटरनेटच्या कृपेने झाडून अशा साऱ्या शिष्यवृत्त्यांची माहिती काही क्लिक्समध्ये झटपट मिळू शकते. यासाठी स्कॉलरशिप्स किंवा फ्रीशिप्स असा सर्च द्यावा. अर्थात हे काम करण्यासाठी आपण ‘शिक्षा’च्या वेबसाइटचाच वापर केला पाहिजे असे नाही; हा शोध सर्च इंजिन उघडून स्वतंत्रपणेही घेता येतो. शिक्षणक्षेत्रात आयटीचा इतक्या खोलवर शिरकाव झाल्याने विद्यार्थ्यांना करावी लागणारी अनुत्पादक पायपीट आणि खर्चात मोठी बचत झाली असून अधिक नेमकपणाने संस्थांची निवड करणे आता शक्य झाले आहे. अशा उपक्रमांमध्ये प्रौढ शिक्षण, कामगारांसाठीच्या रात्रशाळा तसेच अपंग आणि विकलांग विद्यार्थ्यांनाही नवतंत्राचा खूपच फायदा मिळू शकतो. आजच्या तरुणाईसाठी ‘करिअर’ हा शब्द अतिशय महत्त्वाचा ठरतो. या शब्दाचे ढोबळमानाने भाषांतर ‘उपजीविकेसाठी केलेले काम किंवा व्यवसाय’ असे होत असले तरी एखाद्याच्या जीवनशैलीच्या आणि मुख्य म्हणजे जीवनपद्धतीच्या संदर्भात करिअर या शब्दाचे नव्हे, तर संकल्पनेचे वजन निश्चितच जास्त भरते. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम केल्याने मिळणारे मानसिक समाधान किती मोलाचे असते हे आणि असे अनेक मुद्दे यावेळी विचारात घेतले जातात. मात्र व्यावहारिक पातळीवर पाहता केलेल्या कामातून मिळणारे उत्पन्न हाच निकष बहुसंख्य प्रकरणांमध्ये पाळलेला आढळतो. याच अर्थाने ‘करिअर’ या संकल्पनेचा विचार केला आणि जरा मागे वळून पाहिले तर गेल्या शतकात म्हणजे सन २०००च्या थोडे आधीपर्यंत इंजिनीअर होणे ही बहुतेकांची महत्त्वाकांक्षा असे, असे म्हणता येईल; परंतु एकविसाव्या शतकाची सुरुवातच सर्वांचे जीवन व्यापणाऱ्या संगणक आणि संगणकाधारित प्रणालींनी झाली आणि इच्छुकांना करिअर करण्यासाठी सापडलेला नवा पैलू, नवे क्षेत्र म्हणजे कॉम्प्युटर.
कॉम्प्युटर, इंटरनेट, त्यानंतर आलेला स्मार्टफोन आणि या तिघांचे त्रिकूट जमल्यामुळे वर उल्लेख केल्याप्रमाणे महानगरांपासून खेड्यांपर्यंत सर्वांच्याच जीवनात फरक पडला. खासगी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रांबरोबरच गेल्या पाच-दहा वर्षांमध्ये सरकारी विभागही संगणकीय सेवासुविधांवर चालू लागल्याने आणि त्या पुरवूही लागल्याने माहिती तंत्रज्ञान उर्फ ‘आयटी सेक्टर’मध्ये प्रचंड मनुष्यबळाची आवश्यकता भासली. इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर सोडाच, तुलनेने अगदीच प्राथमिक पातळीवरचे संगणकीय अभ्यासक्रम उत्तीर्ण होणाऱ्यांनाही थोड्याफार उमेदवारीनंतर नोकऱ्या सहज मिळत राहिल्या. महत्त्वाचे म्हणजे आयटीमध्ये बहुतेक सर्वांनाच अगदी सुरुवातीपासूनच भरपूर पगार मिळू लागला. पगाराला ‘पॅकेज’ असे संबोधण्याची लाटही बहुधा आयटीमधूनच उगम पावली. परिणामी, करिअर म्हणजे आयटी असे नवे समीकरण प्रस्थापित झाले. अर्थात या गोष्टीलाही आता पंधरा-वीस वर्षे झाली आहेत. या गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये ‘चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट थग’ म्हणजेच ‘बदल हीच सर्वात शाश्वत बाब आहे’ या वाक्प्रचाराचा विसर पडू लागला. खरे तर संगणकीय विश्व इतक्या झपाट्याने बदलत आले आहे की, जुने तंत्रज्ञान किंवा पद्धती कालबाह्य होण्याचा वेग (‘रोलओव्हर पीरिअड’) इथे सर्वाधिक आहे. काही बाबतीत तर अक्षरशः गेल्या महिन्यातल्या प्रणालीची जागा या महिन्यात हाती आलेले नवतंत्रज्ञान घेते आहे. अर्थात इतके क्रांतिकारी बदल अत्युच्च पातळीवरच होत असले तरी कधी ना कधी शेवटच्या स्तरापर्यंत झिरपतात. त्यामुळेच आता संगणक साक्षरता ही कायम सुरू असणारी बाब बनली आहे.
(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत)






