मुंबई : राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांसाठी कायमस्वरूपी स्क्रीन राखून ठेवावी आणि तिकिट दर सर्वसामान्यांना परवडतील असे १०० ते १५० रुपयांदरम्यान ठेवावेत, या मागणीसाठी आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मनसेचे नेते अमेय खोपकर, दिग्दर्शक महेश मांजरेकर, बाबासाहेब पाटील, सुशांत शेलार, मेघराज भोसले आदी चित्रपटसृष्टीतील प्रतिनिधी उपस्थित होते. मल्टिप्लेक्स मालक व प्रतिनिधी म्हणून मयांक श्रॉफ, पुष्कराज चाफळकर, थॉमस डिसूजा आणि राजेंद्र जाला यांनी हजेरी लावली.

बैठकीत गृहसचिवांसमोर मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनासंबंधी धोरण, तिकीट दर, तसेच प्रेक्षकवर्ग वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. बैठकीबाबत बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, “प्रत्येकाने आपले प्रश्न आणि अडचणी मांडल्या असून बैठक सकारत्मक वातावरणात पार पडली.” सरकारच्या वतीने उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांवर लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही दिले आहे.