मुंबई (खास प्रतिनिधी) : जनगणना - २०२७ च्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या सर्व पैलूंचा समावेश असेल. जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्याची म्हणजे घरयादी व घर गणनेची पूर्वचाचणी १० नोव्हेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली जाईल. तसेच स्व-गणना करण्याचा पर्यायही १ नोव्हेंबर २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत उपलब्ध असेल. महानगरपालिका क्षेत्रात एम पश्चिम प्रभागामध्ये अर्थात चेंबूर भागात जनगणना पूर्वचाचणी करण्यात येणार आहे.
जनगणना पूर्वचाचणीच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची जनगणना संचालनालयाच्या संचालक, डॉ. निरूपमा जे. डांगे यांनी मंगळवारी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी भेट घेतली. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील घरयादी व घरगणनेची पूर्वचाचणी निवडक तीन नमुना क्षेत्रांमध्ये केली जाणार आहे. पूर्वचाचणीकरिता निवडलेल्या नमुना क्षेत्रांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या एम/पश्चिम प्रभागातील १३५ घर यादी गट, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तहसील येथील २६ गावे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तहसील येथील ४५ गावे यांचा समावेश आहे. या क्षेत्रांमध्ये होणाऱ्या जनगणना पूर्वचाचणीसाठी जनगणना अधिनियम, १९४८ च्या तरतुदी लागू राहतील. पूर्वचाचणीच्या अनुषंगाने राज्यात ४०२ प्रगणक आणि पर्यवेक्षकांचा चमू कार्यरत असणार आहे.
केंद्र शासनाने सन २०२७ मध्ये जनगणना घेण्याचा निर्णय आधीच अधिसूचित केला आहे. जनगणनेचा पहिला टप्पा म्हणजे घरयादी व घरगणना (टप्पा-१) हा एप्रिल ते सप्टेंबर, २०२६ या दरम्यान एका महिन्याच्या कालावधीत पार पडेल. लोकसंख्या गणना (टप्पा-२) फेब्रुवारी २०२७ मध्ये पार पडेल. जनगणना ही जनगणना अधिनियम, १९४८ च्या तरतुदीनुसार केली जाते. जनगणनेकरिता नियुक्त केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षक, जे माहिती संकलनासाठी वाटप केलेल्या क्षेत्रातील घरे व कुटुंबाना भेट देतील, त्यांना योग्य ते सहकार्य करावे,असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.






