मुंबई: 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोडून बाहेर पडलेले डॉ. निलेश साबळे आता एका नव्या आणि दमदार अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यातून त्यांच्या आगामी प्रोजेक्टचे नाव समोर आले आहे.
निलेश साबळे लवकरच 'वहिनीसाहेब सुपरस्टार' (Vahinisaheb Superstar) या नव्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसतील. निलेश साबळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरवर त्यांचा फोटो असून, कार्यक्रमाचे नाव 'वहिनीसाहेब सुपरस्टार' असे ठळकपणे लिहिले आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील प्रेक्षकांना, विशेषतः महिला प्रेक्षकांना, या नव्या कार्यक्रमाबद्दल सांगत उत्सुकता निर्माण केली आहे. पोस्टरवर 'धमाल खेळ, गप्पा, कॉमेडी, संगीत आणि बरंच काही' असे लिहिल्यामुळे हा कार्यक्रम मनोरंजन आणि विनोदाचा परिपूर्ण डोस घेऊन येत असल्याचे स्पष्ट होते.
'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाचे 'दुसरे पर्व' सुरू झाल्यानंतर निलेश साबळे त्यात नसतील, या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. निलेश साबळे आता एका वेगळ्या वाहिनीवर हा नवा कार्यक्रम घेऊन येत आहेत.
'वहिनीसाहेब सुपरस्टार' हे नावच सूचित करते की, हा कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील 'वहिनी' अर्थात गृहिणी किंवा महिलांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आला आहे. विनोदाचा बादशहा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निलेश साबळे यांच्या सूत्रसंचालनामुळे या शोमध्ये कॉमेडीचा आणि मनोरंजक खेळांचा भरणा असणार हे निश्चित आहे.
डॉ. निलेश साबळे यांच्या 'वहिनीसाहेब सुपरस्टार' या नव्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.