मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप अॅग्रीमेंट’ केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. संबंधित तरुणीने शाहिद शेख नावाच्या तरुणासोबत हा करार करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या कुटुंबीयांनी विश्व हिंदू परिषदेकडे मदत मागितली.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने या कराराची प्रत स्वतःच्या आईला पाठवली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी विश्व हिंदू परिषदेकडे धाव घेतली. परिषदेकडून हस्तक्षेप झाल्यानंतर तरुणीला घरी आणण्यात आले, मात्र काही दिवसांनी ती पुन्हा घर सोडून गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे.
सदर तरुणी मालाड येथे शिक्षण घेत असताना शाहिद शेखच्या संपर्कात आली होती. या दोघांमध्ये ओळख झाली आणि ती ओळख प्रेमात रुपांतरित झाली आणि त्यांनी लग्नाऐवजी केवळ करार करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाने तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला.
या घटनेनंतर विश्व हिंदू परिषदेने याला ‘लव्ह जिहाद’चे नवीन स्वरूप असल्याचा आरोप केला आहे. परिषदेकडून या प्रकाराचा निषेध करण्यात आला असून, अशा ‘अॅग्रीमेंट रिलेशनशिप’द्वारे होणाऱ्या प्रकरणांवर पोलिसांनी आणि सामाजिक संघटनांनी लक्ष ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे ‘लिव्ह-इन अॅग्रीमेंट’सारख्या नव्या संकल्पनांवर कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर चर्चा रंगली आहे.






