मुंबई : ऑस्ट्रेलिया मालिकेचं आव्हान संपण्याआधीच टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेची तयारी करत आहे. दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने वेळेआधीच आपला संघ घोषित केला असून कर्णधारपदातही बदल करण्यात आला आहे.
भारतीय संघ गेल्या काही महिन्यांपासून सलग मालिकांमुळे व्यस्त आहे. आशिया कपनंतर वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका, त्यानंतर सुरू झालेला ऑस्ट्रेलिया दौरा आणि आता थेट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेची तयारी अशा गडबडीत खेळाडूंना विश्रांती घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे.
या मालिकेत भारताने जर २-० ने विजय मिळवला, तर त्यांना गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेता येईल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेलाही आपली विजयाची टक्केवारी वाढवण्याची तितकीच मोठी संधी मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ या मालिकेकडे चांगल्या कामगिरीसाठी प्रयत्न करत आहेत.
दक्षिण आफ्रिकेने या मालिकेसाठी आपला कसोटी संघ जाहीर केला असून, नेतृत्व पुन्हा एकदा टेम्बा बावुमा याच्याकडे देण्यात आलं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत बावुमा अनुपस्थित होता आणि एडन मार्करमने संघाचं नेतृत्व केलं होतं. मात्र आता बावुमा पूर्ण तंदुरुस्त असून तो पुन्हा संघाचं नेतृत्त्व करणार आहे. बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने २०२५ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले होते.
अलिकडे पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका आफ्रिकेने १-१ अशी बरोबरीत सोडवली होती. आता भारताविरुद्धच्या मालिकेत ते विजय मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत. न्यूझीलंडने भारतावर ३-० ने मिळवलेल्या विजयातून दक्षिण आफ्रिका प्रेरणा घेऊन मैदानात उतरणार आहे.
पहिली कसोटी १४ नोव्हेंबर रोजी कोलकात्यात तर दुसरी कसोटी २२ नोव्हेंबर रोजी गुवाहाटीत होणार आहे. या दोन सामन्यांनंतर तीन सामन्यांची वनडे मालिका ३० नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यानंतर ९ ते १९ डिसेंबरदरम्यान टी२० मालिकाही खेळवली जाणार आहे.
भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, मार्को यानसन, एडन मार्करम, जुबेर हमजा, केशव महाराज, रायन रिकल्टन, टोनी डी जॉर्जी, सेनुरन मुतुसामी, ट्रिस्टन स्टब्स, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, काइल वेरेने, वियान मूल्डर आणि सायमन हार्मर.






