शयनयान बसमधल्या वाढत्या अपघातांमुळे सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या अपघातात प्रवासी गंभीर जखमी होतात किंवा त्यांचा मृत्यू होतो, काही दिवसांपूर्वीच कर्नूल येथे दुचाकीला धडकल्यानंतर बसला आग लागून २० जणांचा मृत्यू झाला. शयनयान बसच्या अपघातांसाठी अनेक कारणे असतात, ज्यात बसची किचकट रचना, प्रवासी गाढ झोपेत असणे आणि आपत्कालीन परिस्थितीतून बाहेर पडण्यात येणाऱ्या अडचणीमुळे मानवी प्राणहानी मोठ्या प्रमाणात होते.
सध्या या गोष्टी चर्चेला येण्याची कारणे म्हणजे गेल्या दिवसात या बसच्या अपघातात झालेली वाढ ही आहे. १० ते २४ ऑक्टोबर या केवळ १२ दिवसांत देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी १२ शयनयान बसला अपघात झालेत. कर्नूल अपघात घटनेत हैदराबादहून बंगळूरुला जाणारी स्लीपर बस एका दुचाकीला धडकली, त्यानंतर बसला भीषण आग लागली यात २० प्रवाशांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. कारण म्हणे तर अपघातानंतर बसमधील एका प्रवाशाच्या बॅटरीचा स्फोट झाला आणि बसमध्ये आग लागली. बसमधील प्रवासी गाढ झोपेत होते, ज्यामुळे ते आगीतून बाहेर पडू शकले नाही. आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवे अपघात (जुलै २०२४) एका स्लीपर बसने टँकरला धडक दिली. यात १८ जणांचा मृत्यू झाला. कारण काय तर जोरदार धडकेमुळे बसचे मोठे नुकसान झाले. स्लीपर बस अपघातांची कारणे शोधता, असे लक्षात येते की, अपघातावेळी प्रवाशांना बाहेर पडणे कठीण होते, कारण बसच्या डिझाइनमुळे आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग बंद होतात. काही बसेसमध्ये एकावेळी ३० ते ४० प्रवासी बसू शकतात, ज्यामुळे बाहेर पडण्यात अडचणी निर्माण होतात.
शयनयान बसमध्ये प्रवासी झोपलेले असल्याने, अपघात झाल्यावर लगेच प्रतिसाद देणे शक्य होत नाही. अपघातानंतर आगीमुळे किंवा इतर कारणांमुळे लोकांना लगेच मदत मिळणे कठीण होते आणि प्राणहानी वाढते. सध्या वाहतूक मंत्रालय स्लीपर बसच्या डिझाइनमधील त्रुटी दूर करण्यासाठी विचार करत आहे. मात्र ही चर्चा केवळ एखादा मोठा अपघात झाला की होते आणि पुन्हा सर्व आहे तशीच होते. अपघाताच्या वेळी सुरक्षित बाहेर पडता यावे यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. बसची नियमित देखभाल करणे आणि टायरची तपासणी करणे हे अपघाताची शक्यता कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे. शयनयान (स्लीपर) बसच्या अपघातांची वाढ ही चिंतेची बाब आहे.अपघातांचे मुख्य कारण म्हणजे मर्यादित जागेमुळे प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीतून बाहेर पडणे कठीण होते, ज्यामुळे मृत्यू आणि दुखापतीची संख्या वाढते. याशिवाय, काही बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि सीट बेल्ट सारख्या सुरक्षा उपकरणांचा अभाव आहे, ज्यामुळे अपघातांची जोखीम अधिक वाढत आहे. या बसेसच्या डिझाइनमध्ये त्रुटी असतात. काही डिझाइनमध्ये प्रवाशांना अपघाताच्या वेळी बाहेर पडण्यासाठी योग्य मार्ग नसतात, ज्यामुळे ते अडकून राहू शकतात.
आज स्लीपर बाबतीत म्हणायला गेलं तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची काय स्थिती आहे. आज एसटीकडे एकूण २५० स्लीपर बस आहेत त्यात स्लीपर सीटर २०० असून संपूर्ण शयनयन बस या ५० आहेत. या संपूर्णपणे श्रेणी प्रकारातील आहेत मात्र या सर्व बस साध्या बस गाड्या आहेत त्या वातानुकूलित नाहीत. मात्र आज या बस गाड्यांची अवस्था पाहता या बसमध्ये बसावे की झोपावे हे काहीच कळत नाही इतकी बिकट अवस्था आज महामंडळाने या स्लीपर बस गाड्यांची करून ठेवली आहे यात सर्व आपत्कालीन दरवाजे हे पत्र ठोकून बंद करण्यात आले आहेत त्यामुळे एखाद्या कठीण प्रसंगी प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यात बसच्या पडद्यांची अवस्था वाईट असून तर काही बसला पडदेच नाहीत. प्रवाशांना आपत्कालीन दरवाजे तसेच त्या बाबत सूचना करण्याची कोणतीच यंत्रणा नाही या बस गाड्या रात्री प्रवास करून झाल्यानंतर साफसफाई केल्या जात नाहीत त्यामुळे आतमध्ये बस गाड्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली दिसते. एसटी महामंडळाच्या या बस गाड्या सध्या सर्रास दिवसा धावताना दिसतात, तर काही छोट्या व लोकल मार्गांवरही स्लीपर बस गाड्या पाठवल्या जातात रात्री प्रवास करून झाला की दिवसा या बस गाड्या लोकल बस मार्गावर चालवल्या जातात व पुन्हा रात्री चालवल्या जातात त्यामुळे बस गाड्यांची अवस्था अत्यंत बिकट होऊन बसली आहे. संपूर्ण पैसे मोजूनही व वारंवार तक्रारी करूनही एसटी महामंडळ त्याकडे लक्ष देत नाही विशेष म्हणजे या शयन यान बस गाड्यांचा एक वेगळा ब्रँड तयार करावयास व्हावा होता मात्र एसटीला ते जमले नाही. विशेष बोलायचं झालं तर स्लीपर बस गाड्यांचे आकर्षण हे फक्त भारतातच आहे इतर कोणत्याही देशांमध्ये स्लीपर गाड्यांचा वापर हा प्रवाशांसाठी केला जात नाही. भलेही इतर देशांची भौगोलिक रचना वेगळी व भारतातील भौगोलिक परिस्थिती वेगळी असली तरी, परदेशात कोणत्याही देशात स्लीपर गाड्या या वापरल्या जात नाहीत फक्त भारतातच याचे मोठे फॅड बनले आहे. बरं याच्यात सुरक्षिततेचे कोणतीच नियम पाळली जात नाही, तर आपल्या इथे भ्रष्टाचाराचे कसे टोक गाठले जाते ते येथे पाहता येईल कोणत्याही बस गाड्यांमध्ये सुरक्षिततेचे कोणतेही नियम पाळले जात नाही या बस गाड्या बनवतानाही त्या देशातल्या कोणत्याही भागात बनवल्या जातात मात्र त्यावेळेस त्यांना तेथील आरटीओ मान्यता देत नाहीत मग या बस गाड्या रजिस्ट्रेशनसाठी चक्क पॉण्डेचरी, नागालँड, अरुणाचल प्रदेश यासारख्या ठिकाणी रजिस्टर होऊन येतात. मग देश एक व सगळीकडे वेगवेगळे आरटीओ नियम का? स्लीपर बस गाड्या चालवण्यामागे एक मोठा ब्रॅकेट आहे. त्यात या बस गाड्या चालवण्यापासून रस्त्यावर वाहतूक करण्यासाठी सर्व बांधलेले असतात. त्यामुळे सर्रास वाहतूक सुरू असते. मात्र एखादा अपघात घडला की थोडेफार दिवस कारवाई होते. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. मग दुसरा एखादा अपघात होईपर्यंत सर्व शांत. तसे बघायला गेले तर स्लीपर बसचा प्रवास बसून करण्यापेक्षा धोकादायकच आहे. या प्रवासात अपघात झाल्यानंतर बाहेर पाडण्याचे मार्गच बंद होतात. त्यात आग लागली तर बसमधील पडदे पेट घेतात. बसमधील पार्टीशनसाठी सर्रास लाकूड वापरले जाते ते पेट घेते आणि काही कळायच्या आत मनुष्यहानी व वित्तहानी होते. १ जुलै २०२३ रोजी नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर स्लीपर बसला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता, या अपघातानंतर सर्व स्लीपर बसची झाडाझडती सुरु झाली होती, मात्र काही दिवसाच्या आत सर्व बस या रस्त्यांवर धावू लागल्या. यातच सर्व काही आले. त्यातच आता परिवहन विभागांनी स्लीपर बस ने प्रवास करताना प्रवाशांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यात प्रवास करताना प्रवाशांनी कशी काळजी घ्यावी याचा उल्लेख आहे. मात्र येथे सुद्धा प्रवाशांना वेठीस धरण्याचा परिवहन विभागाचा प्रयत्न दिसतो. मुळात बस गाड्यांची अवस्था वाईट असणे त्यात कोणतीही सुख-सुविधा नसणे उदाहरणार्थ प्रत्येक खिडकीजवळ हातोडा असणे हे गृहीत धरले आहे. मात्र सर्व बसगाड्यातील हातोडे हे गायब झाले आहेत. आपत्कालीन दरवाजांचा तर पत्ताच नाही. अशी अवस्था आहे, मग नियम हे कोणासाठी? जर तेच परिवहन विभागाने बस गाड्यांवर लक्ष ठेवले व थोडा यातील भ्रष्टाचार कमी केला तर यथावकाशच अपघात टाळतील हे नक्की. - अल्पेश म्हात्रे






