मुंबई: किडनीच्या आजारामुळे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. त्यांना निरोप देण्यासाठी चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. मात्र, त्यांच्या गाजलेल्या ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेतील कलाकारांनी त्यांना दिलेला निरोप पाहून चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
मालिकेतील त्यांच्या सह-कलाकारांनी, म्हणजेच त्यांचे पडद्यावरील कुटुंब, रूपाली गांगुली , सुमित राघवन, राजेश कुमार, जे. डी. मजेठिया (निर्माता), आणि देवेन भोजानी यांनी एकत्र येत सतीश शाह यांच्या पार्थिवाजवळ उभे राहून मालिकेचे प्रसिद्ध टायटल साँग गायले.
View this post on Instagram
नेहमी आनंदी आणि विनोदी स्वभावासाठी ओळखले जाणारे हे कलाकार यावेळी अत्यंत भावूक झाले होते. सतीश शाह यांच्या पार्थिवासमोर टायटल साँग गात असताना, 'मोनिशा साराभाई'ची भूमिका साकारणाऱ्या रूपाली गांगुलीला आपले अश्रू आवरता आले नाहीत. ती खूप रडत होती, तेव्हा जे.डी. मजेठिया यांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला.
'रोशेस साराभाई' साकारणारा राजेश कुमार आणि 'साहिल साराभाई' साकारणारा सुमित राघवन हे देखील यावेळी खूप दुःखी आणि शोकाकुल झालेले दिसले. या भावनिक निरोपाबद्दल बोलताना मालिकेचे दिग्दर्शक देवेन भोजानी यांनी सोशल मीडियावर सांगितले की, "आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो, तेव्हा हे गाणे नक्की गातो, आणि आजचा दिवसही याला अपवाद नव्हता. आम्हाला असे वाटले, की 'इंदु' (सतीश शाह यांच्या पात्राचे नाव- Indravadan Sarabhai) स्वतःच आमच्यासोबत सामील झाले आहेत."
सतीश शाह यांनी 'इंदुवदन साराभाई' हे पात्र अनेक वर्षे आपल्या अभिनयाने जिवंत ठेवले होते. पडद्यावर धमाल करणारा हा परिवार खऱ्या आयुष्यातही किती जवळचा होता, हेच या भावनिक निरोपातून दिसून आले. एका महान कलाकाराला त्यांच्या 'कुटुंबाने' दिलेला हा निरोप पाहून चाहतेही खूप भावूक झाले.
सतीश शाह यांचे निधन २५ ऑक्टोबर रोजी किडनी निकामी झाल्यामुळे झाले. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले, पण ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मधील त्यांची भूमिका अविस्मरणीय ठरली.






