सोलापूर: वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी महत्त्वाची असते. याच पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीनिमित्त वारकरी भाविकांसाठी मध्य रेल्वेच्या येथील विभागीय कार्यालय प्रशासनाने चांगला निर्णय घेतला आहे. पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येचा विचार करून रेल्वे प्रशासनाने सोलापूर-मिरज व मिरज-लातूर या मार्गावरून विशेष गाड्या चालवण्याचे घोषित केले आहे.
गुरूवार, 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या काळात रेल्वेच्या 36 विशेष फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.गाडी क्रमांक 01443 मिरज-लातूर 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी 7 वाजता मिरजहून सुटून ती दुपारी 3:30 वाजता लातूरला पोहोचणार आहे. ती गाडी सकाळी 10:15 वाजता पंढरपूरच्या रेल्वेस्थानकावर येईल. गाडी क्रमांक 01444 ही लातूर-मिरज दररोज दुपारी 4:00 वाजता लातूरहून सुटून याच दिवशी रात्री 11:45 वाजता मिरजला पोहोचणार आहे.
या गाडीचे सकाळी 7:45 वाजता पंढरपूरच्या स्टेशनवर आगमन होईल. गाडी क्रमांक 01442 लातूर-मिरज ही दररोज सकाळी 6 वाजता लातूरच्या स्थानकावरून सुटून ती दुपारी 1:50 वाजता मिरजला पोहोचेल. गाडी क्रमांक 01441 मिरज-लातूर दररोज रात्री 10:00 वाजता मिरजच्या स्थानकावरून सुटेल व ती दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30 वाजता लातूरच्या स्थानकावर पोहोचेल. तीच गाडी पुन्हा रात्री 11:50 वाजता पंढरपूरला पोहोचेल.






