Monday, October 27, 2025
Happy Diwali

मुंबईहून सुटणाऱ्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसचा अपघात टळला

मुंबईहून सुटणाऱ्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसचा अपघात टळला

मुंबई : उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथे एक मोठा रेल्वे अपघात टळला. मुंबईहून भागलपूरला जाणारी लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेस दोन भागात विभागली गेली. एक जोडणी (कपलिंग) तुटल्याने मागील तीन डबे गाडीपासून वेगळे झाले. ट्रेनचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. चार तासांनंतर तांत्रिक पथकाने डबे पुन्हा जोडून ट्रेन सोडण्याची परवानगी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार रात्री २: ५४ वाजता माझगव्हाण आणि टिकिरीया रेल्वे स्थानकांदरम्यान हा अपघात झाला. सुदैवाने त्यावेळी ट्रेन ताशी १० किलोमीटर वेगाने धावत होती. या मंद गतीमुळे मोठा अपघात टळला. अपघातानंतर दाब कमी झाल्यामुळे ट्रेन आपोआप थांबली. ट्रेन ज्या ट्रॅकवर धावत होती तिथे आधीच एक सावधगिरीचा आदेश लागू होता. त्यामुळे लोको पायलटला वेग कमी करावा लागला. ही खबरदारी प्रवाशांसाठी फायद्याची ठरली.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एस -१ कोचचे कपलिंग तुटल्याने तीन डबे गाडीपासून वेगळे झाले. ट्रेनचा मंद वेग आणि तांत्रिक ब्रेकिंग सिस्टिम सक्रिय झाल्यामुळे अपघात नियंत्रणात राहिला. वेगळे झालेले डबे ट्रेनच्या सुमारे १०० मीटर मागे थांबले. त्यामुळे ट्रेनही थांबली, जर ट्रेन सामान्य वेगाने प्रवास करत असती तर भयानक जीवितहानी झाली असती.

अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. प्रवाशांच्या सुरक्षेची खबरदारी आधी घेण्यात आली. तंत्रज्ञांच्या तपासणीनंतर आणि सर्व डबे व्यवस्थित जोडून कपलिंग मजबूत असल्याची खात्री करुन घेतल्यानंतर सकाळी ट्रेन सोडण्यात आली. एरिया मॅनेजर नरेश सिंग, स्टेशन मास्तर अब्दुल मतीन, सीएनडब्लू, आरपीएफ,जीआरपीएफ आणि एक तांत्रिक टीम यांनी तपासणी करुन परवानगी दिली. यानंतर गाडी सकाळी सोडण्यात आली. सकाळी ७ वाजता ट्रेन भागलपूरला रवाना झाली. रेल्वे प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिला असून कपलिंग तुटण्याचे कारण शोधण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले आहे, प्राथमिक तपासणीत कपलिंग जॉईन्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे उघड झाले आहे. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आणि सुखरुप आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >