Sunday, October 26, 2025
Happy Diwali

टायमिंगचा बादशहा

टायमिंगचा बादशहा

जेव्हा अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांसारखे अभिनेते सिनेमाचे क्षेत्र गाजवत होते आणि या काळात ते चित्रपटांना पूर्ण कवेत घेऊन होते. तेव्हा दूरदर्शन आणि छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता होता सतीश शहा. त्यांच्या मालिका 'ये जो है जिंदगी', 'फिल्मी चक्कर' आणि 'साराभाई वि. साराभाई' या मालिकांतून सतीश शहा छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवत होते. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून पदवीधर झालेले अभिनेते सतीश शहा यांना १९८३ चा चित्रपट 'जाने भी दो यारो' या चित्रपटासाठी कुंदन शहा याने कास्ट केले. तेव्हा त्याच्या मनात नसेल, की आपण एका अशा अभिनेत्याला पडद्यावर झळकवले आहे, की ज्याने चित्रपटाचे रंगरूप बदलून टाकणार आहोत. त्या नंतर सतीश शहा यांनी सिटकॉम 'ये जो है जिंदगी' ५५ भागांत वेगवेगळ्या भूमिका केल्या. त्यासाठीच ते ओळखले जात होते. दूरदर्शनवर ते सर्वत्र दिसत होते आणि त्यामुळे लोकांना मनोरंजनाचा हा नवा मसाला चांगलाच भावला. कारण तो लोकांच्या सर्व गरजा भागवत होता आणि लोकांना तो चित्रपटगृहात जाऊन पाहण्याची यातायात करण्याची गरज नव्हती. त्यामुळे हा नवा मनोरंजनाचा प्रकार लोकांना चांगलाच भावला आणि त्याला सतीश शहा यांच्यासारख्या अभिनेत्यांनी हसवण्याबरोबरच लोकांना अंतर्मुखही केले. सतीश रविलाल शहा यांचे अनेक चित्रपट आहे आणि अनेक मालिका आहेत. पण 'जाने भी दो यारो' आणि 'अरविंद देसाई की अजीब दास्तान' या मालिका काही विशेष उल्लेखनीय. पण शहा यांच्या 'जाने भी दो यारो' या चित्रपटातील भूमिकेसाठी ते ओळखले जातील. त्यांचे चित्रपट ही असंख्य आहेत. पण त्यांच्या चित्रपटाची मोजदाद करायची म्हटले तर ही त्यांच्या नावाची ही केवळ जंत्री होईल. शहा हे त्या प्रशिक्षित अभिनेत्यांपैकी एक होते जे नेहमी उच्च मागणीमध्ये असत आणि तेही टीव्ही आणि चित्रपटांत. त्यांच्या अभिनयातील खरी ताकद ओळखली ती कुंदन शहा यांनी. जे त्यांचे बॅच मेट होते. १९८४ साली आलेल्या दुसरा क्लासिक दूरदर्शन मालिकेत 'ये जो है जिंदगी' मध्ये त्यांनी त्यांना कास्ट केले आणि शहा यांनी या मालिकेचे सोने केले. ५५ वेगवेगळ्या वेशांत या मालिकेच्या प्रत्येक भागात ते दिसले आणि प्रत्येकवेळा लोकांना ते भावले. सतीश शहा यांच्या अभिनयाची शैली म्हणजे त्याचे विनोदाचं टायमिंग आणि कोणत्याही पात्रात सहजपणे विनोद आणण्याची हातोटी हे होते. त्यामुळे ते कोणत्याही भूमिकेत असोत, तो कधीही कंटाळा आणत नसत तर प्रसन्न शिडकावा विनोदाचा त्यांच्या प्रत्येक भूमिकेत असे.

सतीश शहा यांना विनोदाचे टायमिंग अचूक साधले होते आणि त्यामुळे उत्तम विनोदाची जाण त्यांना होती. त्यांनी प्रत्येक भूमिकेतून विनोद निर्माण केला आणि तो सहज सुंदर असायचा. त्यांना कधीही ओढून ताणून विनोद करावा लागला नाही. त्यांच्या अभिनयाची खोली त्यातून दिसून येते. कोणत्याही भूमिकेला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची शैली होती आणि त्यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली होती हे खरे. सतीश शहा यांनी आपल्या साथीदार कलाकारांना कधीही अपमानित केले नाही आणि त्यांच्या भूमिकांना खाल्ले नाही. सहसा चित्रपट जगात हे सर्वत्र चालते. पण सतीश शहा हे खऱ्या अर्थाने मानवतावादी होते. त्यांचे निधन किडनी निकामी झाल्याने झाले. सतीश शहा हे त्यांच्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखले गेले आणि नंतरही कायम स्मृतीत राहिले अन् राहतील. चित्रपट आणि टीव्ही या दोन्ही माध्यमांत सारख्याच सहजतेने वावरणाऱ्या काही कलाकारांमध्ये सतीश शहा हे होते. सतीश शहा यांना त्यांचे आयुष्य हे त्यांना एक कोडे वाटायचे. याच दृष्टिकोनातून ते जगले आणि मूत्राशयाच्या विकाराने निधन पावले.

स्वतःचे आयुष्य म्हणजे जिगसॉ पझलसारखे आहे असे ते समजत आणि म्हणूनच त्यांनी नियोजन कोणते केले नाही. एक तुकडा जागेवर पडला की बाकीचे तुकडे आपोआप जोडले जातात असे आपले आयुष्य आहे असे समजत. प्रदीर्घ काळ लोकांचे मनोरंजन केल्यानंतर ते बॉलिवुड आणि दूरदर्शनपासून दूर गेले होते. २०२३ मध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले होते. की मला काम करण्याची घाई नाही आणि मृत्यूची घाईही नाही. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. २५० हून अधिक चित्रपटांतून काम आणि दूरदर्शन मालिकांमधून दररोज प्रेक्षकांना दर्शन देणारे सतीश शहा गेले कित्येक दिवस कुठेच दिसत नव्हते. सतीश शहा त्यांच्या अफलातून टायमिंगसाठी ओळखले जायचे पण त्यांच्या मृत्यूचे टायमिंग मात्र चुकले. कारण अजून ते बरीच वर्षे जगले असते. 'जाने भी दो यारो' ही एक ब्लॅक कॉमेडी होती. 'जाने भी दो यारो' या चित्रपटात केवळ एका मृतदेहाची भूमिका साकारून शहा यांनी अचानक कॉफीमधून बाहेर पडून कार चालवण्याच्या सीनमध्ये हसे वसूल केले होते. त्यावेळी त्यांच्या टायमिंगला दाद द्यावी की दिग्दर्शकाच्या कॉमिक सेन्सला याचा विचार करवत नसे. 'फिल्मी चक्कर' असो की 'साराभाई वि साराभाई' सतीश शहा यांनी जबरदस्त धमाका केला. बॉलिवुडमधील दुसरे एक हास्य अभिनेते असरानी यांच्या पाठोपाठ सतीश शहा यांच्या निधनाने बॉलिवुडवर शोककळा पसरली आहे. असे म्हणणे म्हणजे आत्मवंचना ठरेल, उत्तम विनोदाचे वावडे असलेल्या या जगात आणि जेथे विनोद म्हणजे पांचट आणि बाष्कळ शेरेबाजी यांची चलती आहे. अशा जगात सतीश शहा आणि असरानी या खऱ्याखुऱ्या विनोदवीरांनी जाणे ही काळाची मोठी शोंकांतिका आहे. सतीश शहा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Comments
Add Comment