Monday, October 27, 2025
Happy Diwali

'जामतारा २' फेम सचिन चांदवडेची २५ व्या वर्षी आत्महत्या, 'असुरवन'च्या प्रदर्शनापूर्वीच संपवली जीवनयात्रा

'जामतारा २' फेम सचिन चांदवडेची २५ व्या वर्षी आत्महत्या, 'असुरवन'च्या प्रदर्शनापूर्वीच संपवली जीवनयात्रा

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेता सचिन चांदवडे (Sachin Chandavade) याने २५ व्या वर्षी आत्महत्या केली आहे. २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण मराठी कलाविश्वात आणि त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातल्या उंदिरखेडे या मूळगावी सचिन चांदवडे याने आपल्या राहत्या घरात टोकाचे पाऊल उचलले. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत पंख्याला गळफास लावला. घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सचिन चांदवडे हा मूळचा इंजिनिअर असून पुण्याच्या आयटी पार्कमध्ये नोकरी करत होता. अभिनयाच्या आवडीमुळे त्याने नोकरीसोबतच मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले होते. सचिनने नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब सीरिज 'जामतारा २' (Jamtara 2) मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तसेच गणेशोत्सव आणि गुढीपाडवा यांसारख्या सणांच्या वेळी अनेक प्रसिद्ध मराठी कलाकारांसोबत ढोलवादनात सहभाग घेतला होता.

विशेष म्हणजे, 'असुरवन' या आगामी मराठी चित्रपटात त्याची महत्त्वाची भूमिका होती आणि हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार होता. काही दिवसांपूर्वीच त्याने चित्रपटाचे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले होते, ज्यात तो खूप उत्साही दिसत होता. या महत्त्वाच्या टप्प्यावर त्याने हे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

एका उदयोन्मुख आणि प्रतिभावान तरुणाने आयुष्य संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी, मित्रमंडळींनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्टद्वारे त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. 'कलाकंद प्रोडक्शन हाऊस'नेही त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून दुःख व्यक्त करत लिहिले, "आमचा असुरवनचा नायक आता आमच्यात नाही, पण त्याचा अभिनय कायम स्मरणात राहील."

ताज्या, मल्टिप्लेक्स आणि मनोरंजन

Comments
Add Comment