Monday, October 27, 2025
Happy Diwali

आजपासून मुंबईत 'इंडिया मेरीटाईम सप्ताह', केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

आजपासून मुंबईत 'इंडिया मेरीटाईम सप्ताह', केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी) : शंभराहून अधिक देशातील एक लाखापेक्षा अधिक प्रतिनिधी, ५०० प्रदर्शक, २०० पेक्षा अधिक तज्ज्ञ वक्ते, दहा मोठे संलग्न कार्यक्रम, दहा लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीच्या संधी... उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आणि समारोपादिवशी दोन सत्रात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग ! संपूर्ण जगाच्या सागरी व्यापार आणि विकासासंदर्भातील महत्त्वाचा कार्यक्रम मानला जाणारा 'इंडिया मेरीटाईम वुईक- २०२५' आजपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत गोरेगावमधील 'मुंबई एक्झिबिशन सेंटर'मध्ये होत आहे.

भारताच्या सागरी विकासात 'मैलाचा दगड' म्हणून नोंद होणाऱ्या या महासोहळ्याचे यजमानपद केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलवाहतूक मंत्रालयाकडे असले, तरी त्याच्या स्थानिक संयोजन आणि एकूण समन्वयाची जबाबदारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डावर सोपवण्यात आली आहे. राज्याच्या बंदरे व मत्स्यव्यवसाय विकास विभागांतर्गत येणाऱ्या या मंडळाचे नेतृत्व सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे आहे.

देशाच्या बंदर आणि जलवाहतूक क्षेत्राचे मुंबई हे प्रवेशद्वार आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि ४०० वर्षांपेक्षा अधिक सागरी वारसा लाभलेले शहर म्हणून मुंबईची जगात ख्याती आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि तदनुषंगिक घडामोडींसाठी मुंबईचे नांव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच चर्चेत असते. सागरी विषयाशी संदर्भातील जगात मोठा आणि महत्त्वाचा असलेला हा सप्ताह त्यामुळेच मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीला याचा मोठा लाभ होईल, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

मनुष्यजातीचा समुद्र पर्यटनाचा वारसा, जलवाहतुकीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि 'निळ्या क्रांतीला शाश्वत दिशा देण्यासाठी तज्ञांचे विचारमंथन हे या सप्ताहाचे वैशिष्ट्य ठरेल, असे केंद्रीय बंदरे आणि जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी उ‌द्घाटनाला, तर पंतप्रधान मोदी यांनी समारोपाला उपस्थित राहण्याचे मान्य करून या कार्यक्रमाचे देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेले महत्त्व अधोरेखित केले आहे.

Comments
Add Comment