इस्लामाबाद : अफगाणिस्तान सोबतच्या संघर्षाचा फटका आता पाकिस्तानला बसू लागला आहे. देशात टोमॅटोच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. एका अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये टोमॅटोच्या दरात तब्बल 400 टक्के वाढ झाली आहे. 11 ऑक्टोबरपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील युद्धामुळे सीमा बंद करण्यात आली असून, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये आवश्यक वस्तूंच्या किंमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये टोमॅटोचे दर या महिन्यात पाचपटांहून अधिक वाढले आहेत.
पाकिस्तानमध्ये स्वयंपाकात टोमॅटोचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. सध्या टोमॅटोच्या दरांमध्ये 400 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, टोमॅटोचा भाव 600 पाकिस्तानी रुपये (सुमारे 2.13 अमेरिकन डॉलर) प्रति किलो इतका झाला आहे. अफगाणिस्तानमधून येणाऱ्या सफरचंदांच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. अलोकोझई म्हणाले, “आम्ही दररोज सुमारे 500 कंटेनर भाज्या निर्यातीसाठी तयार करतो, पण आता त्या सर्व सडून खराब झाल्या आहेत.”
नॉर्थ-वेस्ट पाकिस्तानातील तोरखम सीमाप्रवेशद्वारावर तैनात एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही बाजूंना सुमारे 5,000 कंटेनर सीमा ओलांडण्याची वाट पाहत अडकलेले आहेत.त्यांनी सांगितले, “बाजारात आधीच टोमॅटो, सफरचंद आणि द्राक्षांची कमतरता जाणवू लागली आहे.” पाकिस्तानच्या वाणिज्य मंत्रालयाने अद्याप या विषयावर कोणतीही टिप्पणी केलेली नाही.
काबुलस्थित पाक-अफगाण चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रमुख खान जान अलोकोझई यांनी सांगितले की, लढाई सुरू झाल्यापासून दोन्ही देशांमधील सर्व प्रकारचा व्यापार आणि ट्रान्सपोर्ट बंद आहे. त्यांनी म्हटले, “प्रत्येक दिवसागणिक दोन्ही देशांना सुमारे 10 लाख डॉलर्सचा तोटा सहन करावा लागत आहे.” दोन्ही देशांमधील वार्षिक व्यापार 2.3 अब्ज डॉलर्सचा असून, यात ताज्या फळभाज्या, खनिजे, औषधे, गहू, तांदूळ, साखर, मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचा मोठा वाटा आहे.
पाकिस्तानच्या एका अहवालानुसार, लसूण: 400 रुपये किलो, आलं: 750 रुपये किलो, कांदा: 120 रुपये किलो, मटार: 500 रुपये किलो, शिमला मिरची आणि भेंडी: 300 रुपये किलो, काकडी: 150 रुपये किलो, लाल गाजर: 200 रुपये किलो, लिंबू: 300 रुपये किलो, कोथिंबीर (जो आधी मोफत मिळायचा) आता छोट्या पुडीसाठी 50 रुपये किंमत झाली आहे.
अलीकडेच पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर चकमकी सुरू झाल्या, जेव्हा इस्लामाबादने काबुलकडे मागणी केली की पाकिस्तानवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवावे. पाकिस्तानचा आरोप आहे की हे दहशतवादी अफगाणिस्तानातील ठिकाणांहून कार्यरत आहेत. तथापि, तालिबानने हे आरोप फेटाळले आहेत. गेल्या आठवड्यात कतार आणि तुर्कीच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे, जो सध्या लागू आहे. मात्र, सीमापार व्यापार अजूनही ठप्पच आहे