Monday, October 27, 2025
Happy Diwali

'ह्युमन कोकेन' हिंदी सायकॉलॉजिकल थ्रिलर लवकरच होणार रिलीज ! पुष्कर जोगचा नवा प्रयोग

'ह्युमन कोकेन' हिंदी सायकॉलॉजिकल थ्रिलर लवकरच होणार रिलीज ! पुष्कर जोगचा नवा प्रयोग

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीत क्वचित पाहिलेलं, वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषा मिटवणारं जग आता पडद्यावर येणार आहे. 'ह्यूमन कोकेन' हा एक धाडसी, सायकॉलॉजिकल थ्रिलर असून तो प्रेक्षकांना मानवी तस्करी, सायबर सिंडिकेट आणि ड्रग कार्टेलच्या काळोख्या आणि अनोख्या जगात घेऊन जाणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले.

या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी अभिनेता पुष्कर जोग आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. 'जबरदस्त' या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारा आणि 'बिग बॉस' मराठीच्या पहिल्या सीझनमधील लोकप्रिय रनर- अप म्हणून ओळख मिळवल्यानंतर तसेच 'व्हिक्टोरिया - एक रहस्य' च्या यशानंतर, पुष्कर आता पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत आणि संवेदनशील विषयावर आधारित सिनेमात झळकणार आहे. एका वेगळ्या रूपात पुष्कर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या चित्रपटाबद्दल पुष्कर जोगने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. 'ह्यूमन कोकेन' हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक चित्रपट आहे. या पात्रात शिरण्यासाठी मी मानसिक आणि शारीरिक तयारीसोबत बऱ्याच कार्यशाळा केल्या. एका गुन्हेगारी जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीचा अंतर्गत संघर्ष समजून घेणं अजिबात सोपं नव्हतं.

या चित्रपटात इशिता राज, सिद्धांत कपूर, जाकीर हुसेन आणि काही ब्रिटिश कलाकारांची स्टारकास्ट असून चित्रपटाला एक आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. सरीम मोमीन लिखित , दिग्दर्शित या चित्रपटाची निमिर्ती स्कार्लेट स्लेट स्टुडिओज, वाईनलाइट लिमिट्स, आणि टेक्सटस्टेप सर्व्हिसेस प्रा. लि. यांनी गुझबम्प्स एंटरटेनमेंटच्या साहाय्याने केली आहे. ची तेंग जू आणि हरित देसाई 'ह्यूमन कोकेन' चे निर्माते असून छायाचित्रण सोपन पुरंदरे, संपादन (एडिटिंग) संदीप फ्रान्सिस, संगीत क्षितिज तारे, तर नृत्यदिग्दर्शन पवन शेट्टी आणि खालिद शेख यांनी केले आहे.

Comments
Add Comment