नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली, ज्यामुळे तहसील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी ३४ वर्षीय शेतकरी साईनाथ खानसोळे याला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळावयाचे शासनाचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. या संतापातून त्याने तहसील कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या तहसीलदारांच्या गाडीवर फावड्याने हल्ला केला. घटनेनंतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले.
तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्याच्या खात्यात यावर्षीचे अतिवृष्टीचे ६,२०० रुपये अनुदान जमा झाले होते, तर मागील वर्षीचे अनुदान देखील मिळालेले होते. तरीही शेतकऱ्याने संताप व्यक्त करत गाडी फोडल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांकडून शेतकऱ्याची चौकशी सुरू आहे.
मराठवाड्यातील नांदेडसह इतर भागातही अतिवृष्टी आणि महापूरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य सरकारने दिवाळीपूर्वी ३२ हजार कोटींचा मदत पॅकेज जाहीर केले होते. मात्र अनुदानाच्या वितरणात उशीर झाल्यामुळे अनेक शेतकरी असे टोकाचे पाऊल उचलत आहेत.






