Monday, October 27, 2025
Happy Diwali

मुंबईमध्ये उभारणार आलिशान 'मरिना'! समुद्र पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई बंदर प्राधिकरणाचे महत्त्वाचे पाऊल

मुंबईमध्ये उभारणार आलिशान 'मरिना'! समुद्र पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई बंदर प्राधिकरणाचे महत्त्वाचे पाऊल

मुंबई: मुंबईला लाभलेल्या अथांग समुद्राचा आणि समुद्रकिनाऱ्यांचा, समुद्राशी निगडित उपक्रमांसाठी वापर करण्याच्या दृष्टीने मुंबई बंदर प्राधिकरणाकडून नेहमी विविध प्रकल्पांचे नियोजन करण्यात येते. त्यातील मरिना प्रकल्पाचे नियोजन प्राधिकरणाने अलीकडेच केले आहे. त्यासंबंधीच्या हालचालींना वेग आला असून खासगी बोटी उभ्या करण्याचा हा तळ भाऊचा धक्का किनारपट्टीपासून ५२३ मीटर आत समुद्रात असणार आहे. हे मरिना १४ हेक्टर एवढ्या परिसरात उभारण्यात येत असून याच्या बांधकामाचा खर्च ४७० कोटी रुपये आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर मुंबई बंदर प्राधिकरण कार्यरत आहे. प्राधिकरणाने आता मुंबईच्या किनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल सुरू केले असून, त्यासंबंधी अन्य उपक्रमही हाती घेतले आहेत. त्यातीलच मरिना हा महत्त्वाचा उपक्रम आहे. या मरिनाची उभारणी १०० टक्के खासगी विकासकाच्या माध्यमातून होणार आहे. त्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

एकदा मरिनासाठीचे कंत्राटदार ठरल्यानंतर त्या ठिकाणी आलिशान हॉटेल, बँका, एटीएम केंद्र, मरिनावर आलेल्यांना मुंबईत नेण्यासाठीच्या कॅबचा तळ, बहुमजली वाहनतळ, बँक्वेट हॉल, क्लब हाउस, लॉन, व्यवसाय केंद्र, तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी सुपर मार्केट, कन्व्हेन्शन केंद्र, बोटींच्या देखभाल व दुरुस्तीची केंद्रे, सीमा शुल्क तपासणी कार्यालय अशा अन्य प्रकारच्या सोयी-सुविधाही उभारल्या जाणार आहेत.

मरिना अंतर्गत एकूण ४२४ यॉट किंवा बोटी उभ्या करण्याची सोय असेल. या बोटींची कमाल लांबी ३० मीटर किंवा त्याहून कमी असेल. मरिना ही संकल्पना प्रामुख्याने अमेरिका किंवा समुद्री क्षेत्रात पुढे असलेल्या नेदरलँड्स, डेन्मार्क या देशांमध्ये आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >