आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू
पालक या नात्याने आपल्या मुलाने मागितलेली प्रत्येक वस्तू घेऊन द्यावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं. असं असलं तरी लाड करणं, प्रेम करणं आणि अतिलाडाने बिघडवणं यात अगदी अस्पष्ट अशी धूसर रेषा असते. पण जेव्हा ही लक्ष्मणरेषा ओलांडली जाते तेव्हा आपण हवं ते देण्याकडे, मागितलं ते दिलंच पाहिजे असं वाटण्याकडे आणि मुलांना बिघडवण्याकडे घेऊन जाण्याचा धोका आहे. या गोष्टीकडे वेळेत लक्ष दिलं नाही तर मोठेपणी या अशा लाडावलेल्या स्वभावाचा नातेसंबंधांवर, करिअरवर आणि एकूणच मुलांच्या वेलबिईंगवर मोठा परिणाम होतो.
यातील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पालकांचं असं वागणं त्यांच्या बऱ्याचदा लक्षात येत नाही. काही हेतू मनात ठेवून पालकांनी ते केलेलं नसतं. पण आपल्या लाडाने मूल बिघडू शकतं हे त्यांच्या गावीही नसतं. ही लक्षणं पालक सहज मिस करतात आणि हळूहळू ती तुमच्या पालकत्वाची स्टाईल बनत जाते. पालकांच्या या ओव्हर प्रोटेक्टिव्ह वागण्याने, मागितलेली प्रत्येक गोष्ट मिळणं हा आपला अधिकारच आहे या विचाराने मग मुलांमध्ये शिस्तीचा अभाव दिसायला लागतो.
मानसशास्त्राने हा शोध घेतलाय की पालकांचं असं लाड करणं हे अखेरीस मुलांना हक्क देण्यासाठी आणि त्यातून बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतं. नेमकं यात घडतं तरी काय? १. अतिलाड करणारे पालक मुलांना आनंद मिळावा यासाठी स्वतःच्याही नकळत ओव्हर इनडल्ज होतात. हा सगळ्यात मोठा तोटा आहे. हे ‘ओव्हर इनडल्ज’ तीन प्रकारांनी होत असतं. १. अतिरेक २. अतिरेकी पालनपोषण-अतिलक्ष देणं, खूप काळजी घेणं, मुलाला खूप जास्त परावलंबी बनवणं. ३. पालकत्वाची हळूवार पद्धत - अगदीच सौम्य वागणं. खूप जास्त प्रतिसाद देणं. अजिबात नियम नसणं किंवा नियमांचा बिलकुल आग्रह न धरणं.
१. मुलांना आनंदी पाहणं हा अशा प्रकारच्या पालकत्वाचा पाया असतो. असं असलं तरी मुलांना खूश करण्याच्या नादात सगळं काही मुलाच्या मनासारखं करायचं ही पालकांची सवय बनू लागते. यातून कठोर परिश्रमाचे मूल्य आणि कष्ट केल्याने त्याचं चांगलं फळ मिळतं हे मुलं विसरायला लागतात. मग प्रत्येक गोष्ट प्रयत्न न करता मला सहजपणे मिळायला हवी अशी अपेक्षा मुलं करायला लागतात. यातून केवळ हे मिळणं हा माझा अधिकारच आहे इतकंच मुलांना वाटतं असं नाही तर भविष्यात अपयश, निराशा आली तर ते अशा परिस्थितीत जुळवून घेऊ शकत नाहीत.
२. स्वतःसाठी मर्यादा घालून घेणं मुलांना जमत नाही. कदाचित मुलांना हे अजून समजत नसेल पण प्रत्येक मुलाला काही ठरावीक मर्यादा घालून देणं ही पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. मुलांनी या मर्यादा समजावून आणि बाउन्ड्रीजबद्दल मनात आदर ठेवला तर ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतील आणि मग मुलं इतरांच्या भावना, गरजा समजून घेऊ शकतील.
जेव्हा पालक आपल्या मुलांबाबत बाउन्ड्रीज सेट करण्यात,मुलांना त्याला प्रतिसाद देण्याकरिता पाठपुरावा करत नाहीत तेव्हा मुलं संयम, मर्यादा ही संकल्पना समजू शकत नाहीत. आपल्याला जे करावंसं वाटतं ते करण्याचा आपल्याला अधिकारच आहे असं त्यांना वाटतं. आपल्या वागण्याचा इतरांवर काय परिणाम होईल याचा विचार ते करत नाहीत.
३. जी मुलं बाउन्ड्रीज सेट करण्यात अपयशी ठरतात ती मुलं मोठेपणी नेमून दिलेल्या मर्यादांचे पालन करण्यास असमर्थ ठरतात. ते नियम, मर्यादा यांचा आदर राखू शकत नाहीत. अशी मुलं शाळेतील वातावरणाशी जुळवून घेऊ शकत नाहीत किंवा जिथे काम करायचे आहे तिथेही बाउन्ड्रीज पाळणं त्यांना कठीण जातं. यासाठीच सुस्पष्ट आणि सातत्यपूर्ण बाउन्ड्रीज मुलांना त्यांच्या वागण्याचे काय परिणाम होतील हे समजून घ्यायला मदत करतात. आणि ते इतरांबाबत अधिक सजग होऊन आदराने बोलतात, वागतात.
४. अतिलाड करणारे पालक आपल्या मुलांचा प्रत्येक प्रश्न स्वतःच सोडवतात. पालक या नात्याने प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की आपण आपल्या पाल्याला ताण, असुविधा यापासून वाचवायचं असतं. हे खरं असलं तरी मुलांचा प्रत्येक प्रश्न सोडवण्यात पालकांनी घाईघाईने उडी घेणं हे मुलांच्या दृष्टीने घातक होऊ शकतं. पालकांचं सतत या गोष्टीत हस्तक्षेप करणं यामुळे मुलाला असं वाटू शकतं की, आपण काही करायला कॅपेबल नाही. असा मेसेज जातो की त्यांच्यात स्वतःमध्ये चॅलेंजेसना तोंड देण्याची क्षमता नाही.
मुलांचा आत्मविश्वास कमी होणं आणि अडचणी दूर करण्याबाबत ते दुसऱ्यावर अवलंबून राहतात. यात ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की खरं म्हणजे आपण थोडं लांब राहिलो तर मुलांना असे प्राॅब्लेम्स सोडवण्याची संधी मिळते. चॅलेंजेसना कसं तोंड द्यायचं आणि परिस्थितीनुसार स्वतःच्या स्वभावात लवचिकता कशी आणायची हेही ते शिकतात. येणाऱ्या अडचणी आणि चुकांमधून शिकणं हा भाग मुलांच्या वाढ आणि विकासातील सगळ्यात कठीण भाग आहे.
म्हणून नेहमीच मुलांना अडचणी सोडवण्यासाठी पालकांनी स्वतः पुढे येण्याऐवजी छोटे छोटे प्राॅब्लेम्स सोडवण्याची संधी मुलांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्याची संधी द्यायला हवी. अशाप्रकारे फक्त प्रश्न सोडवण्यात ते स्वावलंबी होत नाहीत तर चुका होणं हे नॅचरल आहे मात्र त्या चुकांमधून नवं शिकायला मिळतं हे ही त्यांना कळतं.
५. अतिलाड केले तर मुलं कृतज्ञता व्यक्त करायला शिकणार नाहीत. मुलं ही स्पंजसारखी असतात. त्यांच्या अवतीभोवती जे घडतं ते सारं, अगदी ॲटिट्यूड आणि वागणं या साऱ्याच गोष्टी ते शोषून घेतात. आपण जर सतत मोठ्या गोष्टी कराव्या म्हणून मुलांच्या मागे लागायला सुरुवात केली, आणखी यश हवं, अधिक मार्क हवे असं म्हणत राहिलो, जे आहे त्यात कधी समाधानीच झालो नाहीतर आपली मुलंदेखील हेच शिकतील.
हेच सततचं असमाधान घेऊन मुलं मोठी होतील. यातून आपल्याला सारखं काहीतरी नवं, आपण जे मागू ते पालकांनी देणं हा आपला अधिकारच आहे असं त्यांना वाटायला लागेल. त्यांच्याजवळ जे आहे त्याचं त्यांना कौतुक राहणार नाही. याउलट त्यांच्या लहान लहान यशाबद्दल आपण त्यांची प्रशंसा केली तर हे छोटे आनंद त्यांना स्वतःमधील गुणांची किंमत करायला शिकवतील. आपल्याजवळ जे चांगलं आहे त्याबद्दल आपण कृतज्ञ राहायला हवं हे जास्त महत्त्वाचं आहे नाही का! मुलांना प्रत्येकवेळी शिकवायला हवं असं नाही तर ते आपल्या कृतीतून, वागण्यातून दिसायला हवं. तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही काय करता याकडे मुलांचं लक्ष असतं.
६. काही पालक मुलांच्या भावना ओळखायला आणि एम्पॅथी दाखवण्यात अपयशी ठरतात. पण जर पालक एम्पॅथॅटिक होऊ शकले तर खूप फायदा होऊ शकेल कारण ‘सहअनुभूती’ हा एक प्रभावी ट्रेट (प्रकार) आहे ज्यामुळे पालकांना मुलांशी कनेक्ट व्हायला खूप मोठी मदत होते. या एम्पॅथॅटिक होण्याने पालक मुलांच्या भावना समजून घेऊन स्वतःच्या भावना त्यांच्याशी शेअर करू शकतात. याच्यातून पालकांची मुलांशी मजबूत आणि निरोगी मैत्री होते. मुलांना एम्पॅथी नैसर्गिकरीत्या येत नसते. त्यांना हे समजत नाही की मी माझी खेळणी इतरांबरोबर शेअर करायची? माझ्या मित्राचा मूड खराब असेल तर मी का त्याला समजून घ्यायचं? म्हणूनच पालकांनी मुलांना त्यांच्या भावना समजून घ्यायला, इतरांच्या भावना ओळखायला एम्पॅथॅटिक व्हायला शिकवायला हवं. मुलं जेव्हा नाराज असतात त्यांच्या भावना समजून त्यांना माया द्या. त्यांच्या आनंदातही सहभागी व्हा. मुलांना याची जाणीव द्या की तुमच्या वागण्याचा, प्रतिक्रियेचा इतरांवर काय परिणाम होईल. समोरच्याच्या मनाला काय वाटेल.
७. अतिलाड करणारे पालक आपल्या मुलाला जणू सर्वोत्कृष्ट, हुशार आणि परफेक्ट समजतात जसं काही त्यांची मुलं म्हणजे सर्वोत्तम आहेत. त्यांचे पुतळे उभारायला हवेत. पालकांच्या अशा दृष्टिकोनामुळे मुलं स्वतःला ‘सुपिरिअर’ समजतात आणि त्यांना वाटतं की जे आम्ही मागू ते आम्हाला मिळायलाच हवं.
पालकांनी आपल्या मुलांचा, त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करणं ह्यात काही चूक नाही. मुलं म्हणजे आपला अभिमान असतो, आनंदाचं निधान असतं. पण सतत त्यांना ‘महान’ बनवणं यातून नक्कीच प्रश्न निर्माण होतात. जेव्हा पालक मुलांना हे सांगत असतात की तू सगळ्यात ‘बेस्ट ‘आहेस. स्मार्ट आहेस. सगळ्यात जास्त ‘टॅलेन्टेड’ आहेस. हे सतत ऐकल्याने मुलांच्या स्वतःबद्दल अवास्तव अपेक्षा तयार होतात. ते स्वतःला सुपिरिअर समजायला लागतात.
८. अतिलाड करणारे पालक मुलांना त्यांनी केलेल्या चुकांपासून वाचवत असतात. आपल्या मुलांना त्यांनी केलेल्या चुकांचे परिणाम भोगताना पाहणं हे खरंच खूप कठीण असतं... विशेषतः जेव्हा हे परिणाम दुःख देणारे किंवा निराश वाटायला लावणारे असतात तेव्हा पालकांना याचा खूप त्रास होतो.
मुलांच्या मनावर ही गोष्ट बिंबवायला हवी की त्यांना जे हवंय ते त्यांना सहजासहजी मिळणार नाही. यामुळे मुलांना एकमेकांविषयी आदर आणि कोणी मदत केली असेल तर आपण कृतज्ञतेची भावना व्यक्त करायला हवी. दुसऱ्याला थॅंक्स म्हटल्याने ते गोष्टी ग्रॅन्टेड धरणार नाहीत.
अतिलाड केल्याने आपण नकळत मुलांना बिघडवत तर नाही आहोत ना याचं भान ठेवलं तर मुलांना एक चांगला माणूस बनवण्याचं आपलं स्वप्न आपण नक्कीच साकार करु शकू.






