अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच चीनवर शंभर टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. चीनने अमेरिकेला सुरू असलेली रेअर अर्थ मिनिरल्सची निर्यात थांबवल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे अमेरिका आणि चीनमधील संबंध चांगलेच ताणले गेले होते. या गोष्टीमुळे जगात एक नवे व्यापार युद्ध सुरू झाले आहे.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आपल्या आशिया दौऱ्यावेळी आपण चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग याच्यासोबत रशिया आणि युक्रेन युद्धाबाबत चर्चा करणार आहोत, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. एअर फोर्स वनमध्ये रवाना होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ट्रम्प म्हणाले की, आम्ही रशियावर खूप कठोर निर्बंध लादले आहेत. ज्याचा खूप मोठा परिणाम होणार आहे.यामध्ये अमेरिकेला चीनची साथ मिळाली तर हे युद्ध लवकर संपवू शकते. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी चीनने अमेरिकेची मदत करावी, असे आम्हाला वाटते.
गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत दोन्ही देशांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पश्चिमेकडील देशांकडून रशियावर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र तरी देखील रशियाने युक्रेनसोबत आपले युद्ध सुरूच ठेवले आहे.या सर्व पार्श्वभूमीवर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनकडे मदत मागितली आहे.
डोनाल्ड ट्रम्प या आठवड्यात आशियाचा दौरा करणार असून मलेशिया, जपान आणि दक्षिण कोरियाची पाहणी करणार आहेत. याच दरम्यान ते चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याने त्यांनी हे मोठे विधान केले आहे.






