लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर
‘स्वच्छ मुंबई ,सुंदर मुंबई ‘ असे फलक मुंबईत ठिकठिकाणी आपण पाहतो. अनेक प्रसार माध्यमे स्वच्छतेच्या बाबतीत जागरूकतेने प्रचार करतात. अगदी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीचीही स्वच्छता मोहीम राबवली. तेव्हा गाडगेबाबांची आठवण झाली.’आधी केले मग सांगितले’, याप्रमाणे त्यांनी स्वत: गाव व पाणवठा स्वच्छ ठेवावा यासाठी लोकांबरोबर काम केले. शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे अन्न, कपडे, घर, शरीर, परिसर यांच्या स्वच्छतेबद्दल ज्ञान मिळाले. या स्वच्छतेच्या सवयी प्रत्येक व्यक्तीच्या भिन्न प्रकारच्या असतात.
सध्या दिवाळी सण आपण साजरा करत आहोत. आपल्यापैकी किती जणांच्या लक्षात आले की रस्त्यावर भरपूर फटक्यांच्या कागदाचा ढीग पडलेला दिसतो. साहजिकच प्रदूषण वाढते.शहरात विविध कार्यक्रम होत असतात. तेथे मोर्चे, मेळावे, सभा, संमेलने, शिबिरे. आंदोलने निदर्शने करण्यासाठी लोक एकत्र येतात. त्यावेळेस होणारी परिसराची अस्वच्छता ही दैनदिन जीवनात बाधा आणणारी गोष्ट असते. अशा वेळी कितीही मनुष्यबळाचा वापर केला तरी तो अपुराच पडतो.आपण एकीकडे गतिमान आयुष्याच्या गोष्टी करतो.पण त्याच वेळेस अगदी आपल्या आजूबाजूच्या परिसरात सहज कचरा करतो.
आपण पाहतो की कोणताही छोटा-मोठा कार्यक्रम झाल्यानंतर जेवढा उत्साहाने आपण उपक्रम साजरा करतो, तेवढीच जबाबदारी मात्र स्वच्छतेबाबत घेत नाही. पेपर प्लेट्स, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, थर्माेकाॅल, चिप्सच्या पिशव्या-हा सगळा कचरा जागोजागी टाकला जातो. आणि मग आपलेच सुंदर शाळा-परिसर, कुरूप आणि अस्वच्छ दिसू लागतो. मैदाने फक्त ठरावीक काळापुरतीच स्वच्छ न राहता बाराही महिने त्याची निगा व स्वच्छता ठेवणे महत्त्वाचे असते. हे चित्र बदलायचे असेल, तर सर्वप्रथम वृत्ती बदलावी लागते.
स्वच्छता ही फक्त एका शिपायाची, शिक्षकाची किंवा संस्थेची जबाबदारी नसून - ती आपल्यापैकी प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. कार्यक्रमानंतर फक्त १ मिनिट स्वतःचा कचरा उचलून कचराकुंडीत टाकला, तरी परिसर स्वच्छ राहील. चला, आपण काही छोटे पण परिणामकारक नियम आजपासून पाळूया— १. कचरा कचराकुंडीतच टाकूया २. एक-व्यक्ती-एक-कचरा नियम पाळूया ३. प्लास्टिकचा वापर कमी करूया ४. कार्यक्रमानंतर ‘स्वच्छता पाच मिनिटे’ उपक्रम राबवूया आपला परिसर स्वच्छ असेल, तर वातावरण स्वच्छ राहील. वातावरण स्वच्छ राहील, तर विचारही स्वच्छ होतील. आणि विचार स्वच्छ झाले तर वृत्ती बदलून समाज बदलायला वेळ लागणार नाही. म्हणूनच, आज आपण सर्वांनी मनापासून एक संकल्प करूया. “कचरा बाहेर नाही, फक्त कचराकुंडीतच!” “स्वच्छ शाळा-सुंदर शाळा-आपली अभिमानाची शाळा!” हल्ली कोणताही शाळेचा कार्यक्रम, स्नेहसंमेलन, समारंभ किंवा उपक्रम झाल्यानंतर प्लास्टिक, पेपर, थर्माेकॉल, पाण्याच्या बाटल्या यासारखा कचरा जागोजागी टाकला जातो. त्यामुळे शाळेच्या परिसराचे सौंदर्य नष्ट होते, तसेच अस्वच्छता व दुर्गंधी निर्माण होते. यासाठी खालील उपाययोजना कराव्यात- १. कार्यक्रम स्थळी स्वतंत्र कचराकुंड्या ठेवणे -सुक्या व ओल्या कचऱ्यासाठी वेगवेगळे डबे २. पूर्वसूचना देणे-सभेपूर्वी / उद्घाटनावेळी स्वच्छतेबाबत स्पष्ट सूचना ३. “स्वच्छता स्वयंसेवक गट” तयार करणे- ४. प्लास्टिकचा वापर टाळणे ५. कार्यक्रमानंतर ‘५ मिनिट स्वच्छता उपक्रम’ - प्रत्येक सहभागी व्यक्तीने स्वतःचा कचरा स्वतः जमा करणे ६. घोषणा फलक लावणे -“कचरा इथे टाकू नका”, “Use Dustbin” ७. कचऱ्याची योग्य विल्हेवाट - नगरपालिका / रिसायकलिंग यांना नियमित देणे कार्यक्रमापूर्वी किंवा अधूनमधून घोषणा / सूचना द्याव्यात. “कृपया कार्यक्रमानंतरचा सर्व कचरा कचराकुंडीतच टाका. हा आपला परिसर, आपली जबाबदारी. स्वच्छता राखा आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यास सहकार्य करा.” किंवा “Cleanliness is everyone’s responsibility. Kindly use the dustbin and keep our campus clean.” मुंबई बाहेर गेल्यावर इतर काही शहरे, रेल्वे, रस्ते, मंदिरे यांची स्वच्छता डोळ्यांत भरण्यासारखी असते. तेव्हा प्रथम जाणवतात तेथील केलेले कायदे, तेथील नेमलेल्या लोकांचे प्रामाणिकपणाचं काम, तिथली लोकशिस्त. हे सगळं पाहिल्यावर आम्हाला स्वच्छतेचे संस्कार कमी पडत आहेत हे जाणवतं. याचा आम्ही आग्रह, प्रयत्नही करत नाही. स्वच्छतेसाठी पाठपुरावा करत नाही. शाळेत होणारे संस्कार तिथेच राहतात. परिसरातील स्वच्छता कशी राखावी याची जाणिव मोठ्यांना दिसत नाही. तर पुढच्या मुलांना कोणी सांगणार? त्यामुळं रेल्वेफाटक, रेल्वेचे रस्ते, भाजीबाजार, बसस्थानक, मैदान, समुद्रकिनारे, बागा, आजूबाजूच्या गल्लीबोळातही कचऱ्याचे ढीग दिसतात. रस्ते, भिंती पान थुंकण्यानं रंगल्याच दिसतात. त्याबाबत शासकीय पातळीवरील उपाय हे अपुरे पडतात. येथे मनाची स्वच्छता ज्याला त्याला हवीच. मनाची स्वच्छता असेल तरच परिसराची स्वच्छता शक्य होते, स्वतःपासून बदल सुरू झाला तर समाज आपोआप सुशोभित होतो. मनातील कचरा दूर केला तरच जीवन सुगंधी होते, बदल हृदयात रुजला की समाजही सजायला लागतो. मन शुद्ध ठेवणं हीच खरी संस्कृती, स्वच्छ मनातूनच सुसंस्कारांची निर्मिती होते.






