Sunday, October 26, 2025
Happy Diwali

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट प्रेमींमध्ये दिसत आहे. उपांत्य फेरीसाठी आवश्यक असणाऱ्या चार संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व भारत हे संघ पात्र ठरले आहेत. महत्त्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलियाचा संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेला आहे. त्यामुळे सर्वाधिक गुणांनी ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत पहिला क्रमांक लावला. उपांत्य फेरीसाठी सर्वप्रथम ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि शेवटी भारताने धडक मारली.

विश्वचषक २०२५ च्या स्पर्धेत भारत सध्या ६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. भारताचा अजून एक सामना बाकी आहे. त्यात जिंकले तरी ८ गुणांसह ते चौथ्या स्थानावर कायम राहतील. उपांत्य फेरीच्या नियमानुसार, गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या संघाचा सामना चौथ्या स्थानावर असलेल्या संघाशी होतो. त्यामुळे भारताचा सामना सेमीफायनलमधील सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. आता भारताचा सामना सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध होईल हे निश्चित झालं आहे. ३० ऑक्टोबर रोजी होणारा हा सेमीफायनल सामना डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे.

महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा २६ वा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला २४ षटकांत ९७ धावांवर गुंडाळलं आणि त्यानंतर १६.५ षटकांत ३ बाद ९८ धावा करून ७ विकेट्सने सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाचा २०२५ च्या स्पर्धेतील हा शेवटचा सामना असून त्यांनी विजय प्राप्त करत दोन गुण मिळवले. या दोन गुणांसह, ऑस्ट्रेलियाचे आता १३ गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर, दक्षिण आफ्रिका १० गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लंड ९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडला अजून एक सामना खेळायचा असल्याने दुसऱ्या स्थानावर जाण्याची त्यांच्याकडे संधी आहे. तर भारत ६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे..

Comments
Add Comment