Sunday, October 26, 2025
Happy Diwali

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला कोकणाच्या सौंदर्याची भूरळ! विजय देवरकोंडाच्या आगामी चित्रपटाचे रत्नागिरीमध्ये शुटींग सुरू

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला कोकणाच्या सौंदर्याची भूरळ! विजय देवरकोंडाच्या आगामी चित्रपटाचे रत्नागिरीमध्ये शुटींग सुरू

रत्नागिरी: कोकणातील डोंगररांगा, बारमाही वाहणाऱ्या नद्या, स्थापत्य, संस्कृती यामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्याची भुरळ सर्वांनाच पडते. या नैसर्गिक सौंदर्याला जगासमोर आणण्यासाठी अनेक दिग्दर्शक आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण कोकणात करतात. आजवर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण कोकणात झाले आहे. मात्र आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला सुद्धा कोकणाच्या सौंदर्याने भूरळ घातली आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आगामी चित्रपट 'रावडी जनार्दन'चे चित्रीकरण कोकणातील रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे गावात सुरु करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचा नायक विजय देवरकोंडा आणि लोकप्रिय अभिनेत्री कीर्ती सुरेश हे मुख्य चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्याने त्यांना पाहण्यासाठी गावात प्रचंड गर्दी होत आहे.

मागील दोन दिवसांपासून गावातील गुंबद ग्रामपंचायत हद्दीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करण्यात आले आहे. चित्रीकरणासाठी मोठा बंदोबस्त सैतवडे गावात दाखल झाला आहे. सैतवडे गावातील दी मॉडेल इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर जिल्हाधिकारी कार्यालयाचा भव्य सेट उभारण्यात आला आहे. सैतवडे येथील चित्रीकरण पूर्ण झाल्यावर पुढील चित्रीकरण गावाशेजारच्या वरवडे येथे होणार आहे.

सैतवडे गावातील बोरसही मोहल्ला येथेही या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. जवळपास साठ ते सत्तर वर्षांपूर्वी सैतवडे गावात 'सागर प्रेमी सैतवडे' या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. त्यानंतर इतक्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा गावात चित्रपट तयार केला जात असल्याने स्थानिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा