Saturday, October 25, 2025
Happy Diwali

सत्संग एक परीस

सत्संग एक परीस

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे

संगत कोणाची धरावी? चांगल्याची की वाईटाची! कोळसा गरम असला की हात भाजवतो आणि विझला की हात काळे करतो. चंदनाच्या झाडाला शेजारी जर बाभळीचे झाड असेल तर... बाभळीचे झाड हे चंदनाच्या झाडाला करा करा कापते ! चंदनाचे झाड मात्र बाभळीला सुद्धा सुगंधित करून टाकते हीच किमया आहे संगतीची! केवळ नारद मुनी भेटले म्हणून वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. असे प्रत्येकाच्या जीवनामध्ये नारद मुनी यावेत. त्यांचे जीवनच पलटून जावं. व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यसनांध लोकांना सुद्धा सत्संगची गरज असते. ढेकणासंगे हिरा भंगे म्हणूनच म्हटले आहे आपल्या संगतीत तपासून पाहा कोण आहेत आणि त्यांचा आपल्या आयुष्य जीवनावर व्यक्तिमत्त्वावर काय परिणाम होतो ते. कारण इतर जनावरांपेक्षा मानव प्राणी वाणी, बुद्धीमुळे श्रेष्ठ आहे. या विश्वात एक वैश्विक ऊर्जा आहे. ती शक्ती आहे आणि ती आहे अध्यात्माची, नामस्मरणाची, सत्संगाची, अस्तिततेची. आपल्याला इष्ट देवतेचे स्मरण, नामजप यातून आनंद, समाधान, सौख्यप्राप्ती मिळतेच. ही ईश्वरीय संपन्नता आणि समृद्धी लाभते ती यामुळेच आणि जीवनाचे सार्थक होते. ईश्वरी कृपेने सर्व इपसीत साध्य होऊन मनोकामना पुरती होते. त्यासाठी प्रयत्न, साधना, चिकाटी महत्त्वाचे असते. कारण ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे साधन आहे मन आणि हे मन प्रसन्न ठेवण्यासाठी नामस्मरण करावे लागते. पंचेन्द्रियांवर ताबा मिळवावा लागतो. मनाचा निग्रह ठाम असावा लागतो तरच ईश्वराची भेट होते. इंद्रियांवर हिंसा माजली आहे. याचे मूळ आहे सर्वतोपरी संत महंतांनी दिलेला संदेश. स्वचरणासह सत्संगात भर टाका. श्रद्धा हा जीवनाचा पाया आहे. तनमनाची मरगळ झटकून जीवनाला दिशा देते ती भक्ती. मरगळीला झटकून चैतन्याची ज्योत लावा. आत्मविश्वासाने आत्मोद्धाराचा, प्रयत्नांचा दीप तेवता ठेवा आणि यातच स्वतःसह इतरांचाही विकास होईल. परिवर्तन घडेल. प्रबोधन होईल आणि हेच मोठे समाधान आहे, सन्मार्ग आहे. मानवी जीवनात सत्संगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, जसा स्वतः जळून इतरांचे जीवन प्रकाशमान करण्यासाठी, उजळवण्यासाठी माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच खरी प्रार्थना, हीच खरी मानवता आहे. सत्संगात प्रबोधनाचे महान कार्य निरंतर सुरू ठेवावे हा संदेश आपल्या संतमहंतांनी आपल्याला दिला जसे की संत ज्ञानदेव, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत बहिणाबाई, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत मीराबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत कबीर यांनी अज्ञान अंधश्रद्धा, अत्याचार, अधर्म, असत्य, अन्याय हिंसा भेदाभेद अंधा धुंदी इत्यादी विषय स्वयं आचरणाने कीर्तन, प्रवचन आणि लेखनातून समाज प्रबोधन केले, जाणीव, जागृती केली आणि त्यांचे अनुयायी म्हणून आज आपल्याला जगण्याला बळ मिळत आहे. अनुभूती देत आहे. भक्ती खंबीर असेल, तर अशक्यही शक्य होऊ शकते आणि आपल्या जीवनाला, भविष्याला आकार, दिशा स्वप्नपूर्ती आणि ऐश्वर्य संपन्नता येते ती यामुळेच!, ‘‘वैराग्याची भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप!” संत कृपेचे हे दीप मनी तेवूद्या सेवा सुख आम्हा नित्य ते भोजनी आम्ही तुष्ट मनी जेविता सदा. अशाप्रमाणे संत महंतांनी केलेल्या अभंग वाणीतून आपण आपल्या जीवनात निश्चित परिवर्तन घडवू शकतो. स्वतःचे इतरांचे जीवन प्रकाशमान करू शकतो. त्यासाठी नामजप, सेवा, परोपकार यातून संपन्न जीवन, अरे ऐश्वर्या प्राप्त करू शकतो.

Comments
Add Comment