सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने राज्य हादरले आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये त्यांनी पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नोटमध्ये बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचा उल्लेख असून, या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
डॉ. मुंडे यांच्या मृत्यूनंतर आरोपी पीएसआय गोपाळ बदने फलटणमधून फरार झाला. त्याने आपला मोबाईल बंद करून पोलिसांना चकवा दिला. पोलिसांनी सुरुवातीला त्याचा शेवटचा ठावठिकाणा पंढरपूर परिसरात असल्याचे शोधले. त्यानंतर तो सोलापूरमार्गे बीड येथे आपल्या घरी पोहोचल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिस तपासात उघड झाले की, बदने हा दोन दिवसांपर्यंत विविध ठिकाणी फिरत राहिला आणि या काळात त्याने आपल्या मोबाईलमधील काही महत्त्वाचे पुरावे डिलीट केले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी अनेक प्रयत्न करूनही बदनेचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना बडतर्फीचा इशारा दिल्यानंतर त्याने शरणागती पत्करली. आश्चर्याची बाब म्हणजे, फरार असतानाही तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फलटण पोलिसांशी संपर्कात होता. या काळात त्याने काही विशिष्ट पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधल्याचीही माहिती समोर आली आहे.
तपासादरम्यान बदनेने चौकशीत आपल्यावरचे आरोप फेटाळले आणि डॉ. मुंडे यांच्यावर कोणताही अत्याचार केला नाही असा दावा केला. मात्र, त्यांच्या दोघांमधील संबंधांचे स्वरूप काय होते, यावर तो मौन बाळगत आहे. सध्या पोलिस बदनेला बीडपर्यंत पोहोचवण्यात कोणाचा हात आहे याचा शोध घेत आहेत. या घटनेने संपूर्ण वैद्यकीय वर्तुळ आणि पोलिस विभागात चर्चेचे वादळ उठले आहे. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूमागील सत्य आणि आरोपींना कोणाचा पाठिंबा होता, हे समोर येण्यासाठी पोलिस तपास वेगाने सुरू आहे.






