मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व मार्गे अंधेरी पश्चिमपर्यंत जाते. मात्र आता गुंदवलीवरून थेट मिरा रोडपर्यंत प्रवास करता येणार आहे.
आता मेट्रो २अ (पिवळी मार्गिका / Yellow Line) आणि मेट्रो ७ (लाल मार्गिका / Red Line) स्वतंत्रपणे चालवल्या जाणार आहेत. सध्या दोन्ही मार्गिकांचे संचालन चारकोप डेपोतून होत असले तरी पुढे मेट्रो ७ चे संचालन चारकोप डेपोतून आणि मेट्रो २अ चे संचालन मंडाळे डेपोतून होईल. मेट्रो २ब (डायमंड गार्डन - मंडाळे) हा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे मेट्रो २अ आणि २ब या दोन्ही मार्गिका जोडल्या जातील.
दहिसर पूर्व ते काशिगाव (मिरा रोड) या मेट्रो ९ मार्गिकेचे कामही अंतिम टप्प्यात असून, ती लवकरच सुरू होणार आहे. नंतर मेट्रो ७ आणि मेट्रो ९ जोडल्या जातील त्यामुळे गुंदवलीवरून मिरा रोडपर्यंत थेट मेट्रो सेवा उपलब्ध होईल. तसेच मेट्रो ७ चा विस्तार विमानतळापर्यंत होणार आहे. यानंतर मेट्रो ७अ, ७ आणि ९ या तिन्ही मार्गिका एकत्रित होतील. या बदलांमुळे मुंबईतील चेंबूर, कुर्ला, BKC, विमानतळ आणि काशिगाव ही ठिकाणे थेट मेट्रोद्वारे जोडली जातील.
मुंबई मेट्रोचे जाळे आणखी विस्तारत असून, पुढील काही महिन्यांत अंधेरी ते मिरा रोड, तसेच चेंबूर ते विमानतळ या महत्त्वाच्या भागांमध्ये प्रवास करणे अधिक सोपे होणार आहे.






