नक्षत्रांचे देणे डॉ. विजया वाड
सभा गच्च भरली होती. ती नि तो असे हजर होते. नारायण लावे नि लक्ष्मी लावे. लक्ष्मीने डोईभर पदर घेतला होता. नारायणराव आता परदेशाचे अॅम्बॅसॅडर झाले होते. पंतप्रधानांचे लाडके होते. नारायणरावांची पत्नी लक्ष्मी अगदी पहिल्यांदाच नारायणरावांच्या सभेस उपस्थित होती. खुद्द पंतप्रधानांची तशी इच्छा होती. लक्ष्मी खाली मान घालून, डोईभर पदर पांघरून, त्यांच्या आवडीचे लुगडे नेसून, त्यांच्या, नारायणरावांच्या अगदी शेजारी बसली होती. चेहराभर संकोच दाटलेला होता. नारायणचे जोरदार भाषण झाले. मी जे काही केले, ते सारे देशासाठी, माझ्या मातृभूमीसाठी केले. “अन् गृहलक्ष्मीसाठी काय केले?” एकाने प्रश्न केला. नारायण क्षणभर गोंधळला, गडबडला. मग नारायणराव भानावर येत म्हणाले, “लक्ष्मी माझी गृहदेवता आहे. पन्नास माणसांचे माझे विशाल कुटुंब सांभाळते आहे. या पन्नास माणसांचा संसार सुखाने चालावा इतका पैका मी तिला आणून देतो. ती घर सांभाळते सुखाने. मी त्यांच्यात पडत नाही. विचारा हवे तर तिला. मी जगासाठी जगतो, ती घरासाठी जगते. हो ना गं. लक्ष्मी?” सभागृहात टाळ्यांचा गजर झाला. नारायणरावांचे जगासाठी जगणे सर्वश्रुत होते. लोकमान्य होते. पण त्यांचे खासगी जीवन? ते अज्ञात होते आजवर. आज प्रथमच त्यांची गृहलक्ष्मी जनतेसमोर आली होती. तेही पंतप्रधानांच्या आग्रहास्तव. “वहिनी साहेब तुम्ही बोला. तुम्हास आम्ही प्रथमच बघतो आहोत.” जमावाने प्रचंड आग्रह केला. मग शेवटी नारायणराव म्हणाले, “ती पन्नास माणसांचा संसार सुखाने सांभाळते, म्हणून मी जग गाजवू शकतो.” “पण वहिनीसाहेबांनी चार शब्द बोलले पाहिजेत.” “हो. बोललेच पाहिजेत.” “गृहलक्ष्मी बाई, बोला मनातलं.” जमावाचा दबाब वाढत चालला. प्रचंड वाढला. शेवटी ती म्हणाली, “बोलते, पण हसू नका हं. बोलायची मला सवय नाही.” “वहिनीसाहेब, जिंदाबाद !” जमावाने उद्घोष केला. टाळ्यांनी प्रचंड कडकडाट केला. “बोला, दोनच शब्द. जास्त बडबड नको.” नारायणराव कुजबुजत पत्नीस खालच्या आवाजात दटावत म्हणाले. तिने दोन्ही अंगी, डोईवर पदर गच्च बांधला, तो कानामागून लपेटला. बोलू लागली. “जनता जनार्दनास माझे साष्टांग दंडवत. तुम्ही यांना मोठे केलेत. साजरे केले. मी तुमच्या सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्हा सर्वांस माझा आदरपूर्वक नमस्कार. पंतप्रधानसाहेबांनी यांना मानाची खुर्ची दिली, त्यामुळे साहेब देशविदेशात जाऊ शकले. मोठ्या साहेबांची मी मनापासून आभारी आहे, मोठे साहेब खरोखर दर्यादिल आहेत.” मग तिने डोईवरचा पदर अधिक घट्ट केला. दोहीअंगी लपेटला. “मी पण माझ्यापरी खूप प्रयत्न केला. यांना वरचे पद मिळावे यासाठी नवस-सायास केले. पण साहेबांना हा चक्क वेडेपणा वाटला. ते देवास मानतात की नाही, मला ठाऊक नाही. पण मी साहेबांनाच देवाच्या जागी मानले.” यावर टाळ्यांचा गजर झाली. ती शांत होती. “आपल्या हिंदू संस्कृतीत, पतीला पतिदेव म्हणतात. तिलाही गृहदेवता असं संबोधन आहे. पण तिचे साम्राज्य घरापुरतेच मर्यादित आहे. पतीने जग गाजवावे नि पुरुषाच्या स्त्रीने घर सांभाळावे हा जगाचाच नियम आहे. स्वयंपाकीण गृहदेवता म्हणजे खऱ्या अर्थाने स्वयंपाकीण ! स्वयंपाकीणीस गृहदेवता असे गोंडस नाव दिले, तरी खरा अर्थ तोच ! तिची किंमत तीच ! ‘अक्कल पाजळू नकोस’ हा नवऱ्याचा शब्द ऐकलाच नाही अशी बायको शोधून सापडणार नाही.” ती थोडीशी थांबली. टाळ्यांचा गजर तिला अपेक्षित होता. तसा तो झाला. “मी मात्र यांचा विकास व्हावा, यासाठी जीवनभर झटले. काय काय सुचेल ते करत राहिले. आयुष्यभर आठवड्यातून दोनदा उपवास केला. यांच्या यशासाठी देवापुढे सतत हात जोडले. कोणतीही बायको करेल, ते ते सारे साहेबांसाठी केले. स्वत:च्या रूपाचीही पर्वा केली नाही. हे बघा” वहिनीसाहेबांनी डोईवरचा पदर काढला. उघडे बोडके डोके. “तिरूपती बालाजीला केशदान केले आहे. यांच्यासाठी!” सभा नि:शब्द होती.






