Friday, November 21, 2025

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर पाच परिसरात ही घटना घडली आहे. परिसरातील कुख्यात गुंड करण आणि अर्जुन यांच्या विरोधात संबंधित पत्रकाराने बातमी प्रसारित केली होती. या गोष्टीचा राग मनात धरून पत्रकार संदीप सिंग आणि त्याच्या भावावर गुंडांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

उल्हासनगरच्या शिव कॉलनीमध्ये राहणारे गुन्हेगार करण आणि अर्जुन विटेकर यांची परिसरात फार दहशत आहे. आपल्या विरोधात पत्रकाराने दिलेली बातमी त्यांना पटली नाही. त्यामुळे त्यांनी शुक्रवार, २४ ऑक्टोबरच्या रात्री संदीप सिंग आणि त्याच्या भावावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात संदीपच्या भावाच्या हातावर तलवारीने वार करण्यात आला. तर संदीप सिंह याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी आहेत.

या घटनेसंदर्भात हिललाईन पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. हल्ला करताना मुख्य आरोपी करण आणि अर्जुनसोबत त्यांचे इतर दोन साथी होते. त्यापैकी दोघांना पकडण्यात आले आहे. तर मुख्य आरोपी अजून फरार आहेत. या प्रकरणामुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment