सातारा (Satara Doctor Death) : सातारा जिल्ह्यातील फलटणमधील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. महिला डॉक्टरने हातावर कारण लिहून त्यात दोघांची नावं नमूद करून आत्महत्या केली. आपल्या चार पानांच्या सुसाईड नोटमध्ये तिने पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. महिला डॉक्टरने बलात्काराचा आरोप केलेला पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने पोलिसांसमोर शरण आला. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. यापूर्वी पोलिसांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि सहआरोपी प्रशांत बनकर याला अटक केली होती.
हातावर लिहिली सुसाईड नोट...
सातारा जिल्ह्यातील २८ वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह गुरुवारी रात्री हॉटेलच्या एका खोलीत गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. बीड जिल्ह्यात राहणारी आणि फलटणच्या एका सरकारी रुग्णालयात ती कार्यरत होती. आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली. ज्यामध्ये तिने पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेवर बलात्काराचा आरोप केला असून, सॉफ्टवेअर इंजिनियर प्रशांत बनकर तिला मानसिकदृष्ट्या त्रास देत असल्याचं त्यात म्हटलं आहे.
आरोपी पोलीस उपनिरीक्षक अटकेत...
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला शनिवारी रात्री उशीरा अटक केली. यापूर्वी फलटण पोलिसांच्या एका टीमने सॉफ्टवेअर इंजिनियर प्रशांत बनकर याला अटक केली. सातारा पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांनी सांगितलं की, पोलीस उपनिरीक्षक बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात शरण आला दुसरीकडे पीडितेला मानसिक छळ आणि आता आत्महत्या करण्यासाठी उद्युक्त करण्याचा आरोप असलेला बनकर याला सातारा जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
आरोपी बदने काय म्हणाला ?
रात्री उशिरा एकच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेला वैद्यकीय तपासणीसाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोर्टावर, कायदेशीर गोष्टींवर आणि पोलीस प्रशासनावर विश्वास आहे, असे वक्तव्य पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने केलं आहे.






