नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षण (SIR) बाबत तारखा जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली ही पत्रकार परिषद संध्याकाळी चार वाजून पंधरा मिनिटांनी आयोजित केली आहे.
अहवालानुसार, पहिल्या टप्प्यात १० ते १५ राज्यांचा समावेश विशेष गहन पुनरीक्षणसाठी केला जाणार आहे. विशेषत: २०२६ मध्ये विधानसभाच्या निवडणुका ज्या राज्यांमध्ये होणार आहेत अशी राज्ये विशेष गहन पुनरीक्षणसाठी सर्वप्रथम निवडली जातील. ज्यात तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पॉंडीचेरी या राज्यांचा समावेश असेल. विशेष गहन पुनरीक्षण ही मतदार यादी अद्ययावत आणि शुद्ध करण्याची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. ज्यात नव्या मतदारांचे नोंदणीकरण, मृत व्यक्तींची नावे वगळणे, दुबार नोंदी काढून टाकणे आणि स्थलांतरासंबंधी बदल करणे यांचा समावेश होतो.






