Tuesday, November 18, 2025

मुंबईजवळ ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, १४ कोटींची ड्रग्स जप्त

मुंबईजवळ ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, १४ कोटींची ड्रग्स जप्त

वसई : वसईच्या पेल्हार येथे मुंबई पोलिसांच्या झोन सहामधील अँटीनार्कॉटिक्स सेल आणि टिळक नगर पोलिसांनी मिळून केलेल्या कारवाईत एका ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे. पेल्हार येथील रशीद कंपाउंडमध्ये राजरोसपणे MD ड्रग्स बनवण्याचा कारखाना सुरू होता. महत्वाचं म्हणजे याचा मास्टरमाईंड दुबईतून MD ड्रग्स फॅक्टरी ऑपरेट करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का ? याचा तपास सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी टिळकनगर पोलीस ठाण्यात ड्रग्स संदर्भात एक गु्न्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याप्रकरणी तपास सुरू असताना ड्रग्सच्या कारखान्याबाबत माहिती मिळाली. माहिती मिळाल्यावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत सात किलोपेक्षा जास्त ड्रग्सचा साठा सापडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेक्षात याची किंमत १४ कोटी रुपये असल्याचे सांगितलं जात आहे.

ज्या ठिकाणी धाड टाकण्यात आली त्या ठिकाणापासून जवळच पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशन जवळ असूनही या भागात ड्रग्स फॅक्टरी सुरू होती. काही दिवसांपूर्वी जवळच असलेल्या कामन या गावात ड्रग्सची फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली होती. त्यानंतर आता पेल्हार येथील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स निर्मितीचा कारखाना सुरू होता, जो बंद करण्यात आला.

Comments
Add Comment