स्नेहधारा : पूनम राणे
वसुधा नावाची एक मुलगी होती. सावळ्या वर्णाची. अतिशय शिस्तप्रिय, हुशार आणि मनमिळावू होती. सगळ्या शिक्षकांची आवडती होती. वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी व्हायची. तसेच उत्तम खेळपट्टू, जिन्मास्टिकमध्ये तिने दोन कांस्य आणि एक ब्राँझ पदक मिळवले होते. इयत्ता नववीमध्ये ती शिकत होती.
वसुधा इतकी हुशार असूनही तिला स्वतःमध्ये काहीतरी अपुरेपणाची जाणीव नेहमी असायची. माझ्या नाकाला शेंडा नाही. मला तर गणित सोडवता येत नाही, मी सुंदर नाही. असे विचार तिच्या डोक्यात चालू असत. नेहमी आपल्याला काय येतं हे सोडून माझ्याकडे हे नाही, ते नाही असा नकारात्मक विचार ती करायची. त्यामुळे ती नेहमी उदास असायची.
एक दिवस शाळेत वर्ग सुरू असताना सूचना वही घेऊन शिपाईकाका आले. रेणुका मॅडमनी सूचना वाचली. ती सूचना दिवाळी सुट्टीनंतर सहलीला जाण्याची होती. एका अनाथ वृद्धाश्रमाला भेट द्यायची होती. विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करावी यासाठी ती सूचना आली होती. सगळेजण खूश झाले.
वसुधा व तिचे वर्गमित्र, यांनी नाव नोंदणी केली. सहलीच्या ठरल्या दिवशी सर्वजण निश्चित स्थळी पोहोचले. तिथे पोहोचताच सगळेजण थक्क झाले. सहल शांतीवन या ठिकाणी गेली होती. आजूबाजूचा सर्व परिसर प्रसन्न वातावरणाने फुलून गेला होता. तेथे जाऊन विद्यार्थी कुष्ठरोगी आणि अपंग व्यक्तींना भेटून, श्रमदान करणार होते.
सगळेजण जसे जसे पुढे निघाले, तसे तसे तेथील वृद्ध व कुष्ठरोग्यांना पाहून विद्यार्थ्यांचे हृदय हेलावून गेले. तेथील वृद्धांशी व कुष्ठरोग्यांशी त्यांनी संवाद साधला. शाळेतून निघताना ५० रोपटे शिक्षकांनी घेतली होती. वृक्षारोपणाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांमार्फत केला गेला. छानपैकी जेवण करून सर्वांचा निरोप घेऊन शाळेकडे सर्वजण परतले. बसमध्ये बसताच वसुधाला रडू कोसळले. नकळत ते कुष्ठरोगी, अपंग व्यक्तींची आठवण व तेथील परिस्थिती तिच्या डोळ्यांसमोर हालत नव्हती. कोणाला चालता येत नव्हते, कोणाला बोलता येत नव्हते, कोणाला पाहता येत नव्हते, तर कोणाला ऐकूही येत नव्हते. किती त्रासदायक याचे जीवन आहे, असा विचार तिच्या मनात सतत येत होता.” असे जीवन जगताना त्यांच्या मनाला अपंगत्व येत नसेल का? तरीही किती आनंदाने जीवन जगतात ही माणसे!”
त्या माणसांपेक्षा मी किती सुदृढ आहे, माझे सगळे अवयव चांगले आहेत, मला कोणता आजार नाही, मी माझी कामे स्वतः करू शकते. असा सकारात्मक विचार वसुधाच्या मनात आला. त्या सहलीनंतर वसुधा पार बदलून गेली. आपल्याकडे काय नाही हे पाहण्यापेक्षा काय आहे याचा विचार करू लागली. छान प्रगती करू लागली. ती समाधानी राहू लागली.
बोध :- आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहणे.






