Sunday, October 26, 2025
Happy Diwali

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे. अटकेतील एका आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या आरोपीला लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणचा दौरा करणार आहेत.

मुख्यमंत्री फलटणमध्ये एक जाहीर सभा घेणार आहेत तसेच निवडक विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. सभास्थळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई उपस्थित असतील. सभेच्या निमित्ताने मुख्यमंत्री काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टर तरुणीने आपल्या हातावर आत्महत्येचे कारण स्पष्टपणे नमूद केले होते. यामध्ये तिने पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला होता. याव्यतिरिक्त, घरमालक प्रशांत बनकर याने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचेही तिने लिहिले होते.

डॉक्टर तरुणीने मृत्यूपूर्वी, पोलीस उपनिरीक्षक बदने आणि एका खासदाराच्या स्वीय सहाय्यकाकडून रुग्णालयात तपासणीसाठी देणाऱ्या आरोपींना 'फिटनेस सर्टिफिकेट' देण्यासाठी दबाव आणला जात असल्याची तक्रार देखील नोंदवली होती. या तक्रारीचा संबंध स्थानिकांकडून भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी जोडला जात आहे. त्यातच आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेला निंबाळकर उपस्थित राहणार असल्याने ते आज काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा