टप्प्याटप्प्याने मच्छीमारांसाठी वेगवेगळ्या २६ योजना होणार कार्यान्वित
मच्छीमारांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न
वेंगुर्ले : केंद्राची प्रधान मंत्री मत्स्यसंपदा योजना आहे, त्याचा मच्छीमारांना फायदा होतो. याच धर्तीवर महाराष्ट्रातील मच्छीमारांसाठी येत्या जानेवारी २०२६ पासून राज्यात "मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना" आणली जाणार आहे. या योजनेसह वेगवेगळ्या २६ योजना पण टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहोत. यामुळे अनेक फायदे मच्छीमारांना होणार असून मच्छीमारांच्या जीवनमानामध्ये अमुलाग्र बदल करण्याचा, त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, अशी माहिती बंदर व मत्स्य विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ले येथे मच्छीमार मेळाव्यात बोलताना दिली. वेंगुर्ले येथील साई मंगल कार्यालयात भाजपाच्या वतीने मच्छीमार मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना मत्स्य विकास मंत्री नितेश राणे म्हणाले की, अन्य राज्यांबरोबर जेव्हा आपण मत्स्य व्यवसायाची तुलना करतो. त्या वेळी तेथील मच्छीमार बांधवांसाठी काय क्रांतिकारक निर्णय घेतले याचा अभ्यास केला. बदलत्या निसर्गामुळे या व्यवसायावर होणारे परिणाम या सर्वानंतर आपल्या भागातील मच्छीमार सक्षम झाला पाहिजे, त्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी मत्स्य व्यवसाय खात्यामार्फत प्रयत्न सुरू आहेत. यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. देशातील मत्स्य व्यवसाय करणाऱ्या राज्यांमध्ये आपल्या राज्याचा क्रमांक सहावा आहे. त्यामुळे आपल्या मच्छीमारांचे उत्पन्न वाढवायचे कसे आणि खर्च कमी कसे करायचे त्या दृष्टिकोनातून काम सुरू आहे.
शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांनाही नुकसान झाल्यावर नुकसान भरपाई मिळावी म्हणून १०० टक्के कृषीचा दर्जा मच्छीमारीला दिला आहे, आणि देशातील असे करणारे हे एकमेव महाराष्ट्र राज्य आहे. त्यामुळे आता मच्छीमारांना विजेमध्ये सवलतही मिळू शकते. त्यासाठी मत्स्य विभागाकडे अर्ज करा. मत्स्य आयुक्त सागर कुवेस्कर आहेत. या मेळाव्या मध्येही त्यांना सोबत आणले आहे. त्यांच्याकडे मागणी करा असे आवाहन मंत्री राणे यांनी केले.
मत्स्य विकास मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर या भागातील मच्छीमारांच्या विकासासाठी माझे प्रयत्न आहेत. आम्ही योग्य पद्धतीने काम करत आहोत आणि पुढेही करत राहणार आहोत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी मतदार म्हणून मी ज्या भाजप पक्षाचा आमदार आणि मंत्री आहे. त्या पक्षाचे काम करताना माझ्यामागे खंबीरपणे निवडणुकीमध्ये उभे राहावे. माझ्या आणि भाजपा पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद या निवडणुकीत जो उमेदवार मतदानासाठी उभा राहिल त्याला साथ द्यावी. तुमचं आणि माझं म्हणजेच आपलं हे जे नातं आहे ते अधिक घट्ट करण्याची जबाबदारी माझ्याबरोबर निवडणुकीवेळी तुमची आहे. तुम्ही साथ द्या प्रतिसाद देण्यासाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे असेही मंत्री राणे यांनी सांगितले.





