महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे
अक्रूर हा यादव दूरच्या नात्याने वसुदेवाचा भाऊ असल्याने कृष्णाचा काका असल्याचा उल्लेख भागवतात आहे. अक्रूरच्या वडिलांचे नाव श्वफलक व आईचे नाव गांदीनी होते, तर पत्नीचे नाव उग्रसेना होते. तसेच अक्रूरला सुदेव व उपदेव नावाची दोन मुले होती. कंसाने महाराज उग्रसेनला कैदेत टाकून राज्य बळकावले. बहीण देवकी व वसुदेव यांच्या पुत्राकडून आपला मृत्यू होणार आहे अशी आकाशवाणी झाल्याने कंसाने वसुदेव आणि देवकीला कैदेत टाकले. तसेच वसुदेव समर्थक वाटणाऱ्या यादवांनाही अटक केली. त्यामुळे अनेक वसुदेव समर्थक यादव पळून गेले. अक्रूर वसुदेवाचा समर्थक असला तरी वरकरणी त्याने कंसाच्या बाजूला असल्याचे भासवून दरबारात राहणे पसंत केले. कंसाच्या दरबारात राहून त्याने अनेकांना विखुरलेल्या अन्यत्र गेलेल्या यदुवंशींना एकत्र करून त्यांचा एक गट स्थापन केला. अक्रुराची सहानुभूती वसुदेव देवकी प्रति होती तरी वरकरणी तो कंसाचा समर्थक असल्याचे भासवीत असे. दरबारात त्याच्या शब्दाला मान होता. अक्रूर विष्णूचे वंदन प्रधान भक्त होते.
आपल्या मृत्यूला कारण असणारा कृष्ण गोकुळात वाढतो आहे, हे पाहून कंसाने आपल्या राक्षस हस्तकाकरवी बालकृष्णाला ठार मारण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र ते सर्व असफल ठरून प्रयत्नासाठी गेलेल्या राक्षसांचाच नायनाट झाला. कृष्ण जस जसा वाढू लागला तसतसा मृत्यूच्या भयाने कंस भयभीत होऊ लागला. म्हणून कंसाने बलराम श्रीकृष्णांना गोकुळातून मथुरेत बोलावून आपल्या मल्लाकरवी ठार करण्याचा कट रचला व कृष्ण आणि बलरामाला गोकुळातून आणण्याची जबाबदारी अक्रुरावर सोपविली. अक्रूर वसुदेव समर्थक होता. त्यामुळे या कोवळ्या मुलांच्या भवितव्याबाबत त्यांना चिंता वाटू लागली; परंतु कंसाची आज्ञा असल्याने जाणे भाग होते, कंसाच्या आज्ञेने अक्रूर गोकुळात गेला. बलराम, श्रीकृष्णाने त्यांचे स्वागत करून मथुरेतील आपल्या नातलगांचे क्षेम कुशल जाणून घेतले. अक्रुराने कृष्ण बलरामांना वंदन करून कंसाचा निरोप दिला तसेच त्याचे अंतर्गत कटकारस्थानही सांगितले. कृष्ण बलरामांना घेऊन अक्रूर मथुरेला निघाले; परंतु या कोवळ्या बालकांना आपण क्रूर कंसाच्या हवाली करीत आहोत या जाणिवेने ते अस्वस्थ व चिंताग्रस्त होते. कृष्णाने त्यांना व्यर्थ चिंता न करण्यास सांगितले. मथुरा-वृंदावन दरम्यान यमुना तीरावर ते थांबले. त्यावेळी कृष्ण बलराम शुचिर्भूत होऊन रथात बसले. तेव्हा अक्रूर यमुनेवर स्नानासाठी गेले. पाण्यात बुडी मारताच त्यांना पाण्यात कृष्ण, बलराम बसलेले दिसले. आश्चर्यचकित झालेल्या अक्रुराने पाण्यावर डोके काढून पाहिले तर कृष्ण, बलराम रथात बसलेले होते. आपल्याला भ्रम झाला असावा असे वाटून अक्रुराने पुन्हा पाण्यात बुडी मारली असता त्यांना पाण्यात पुन्हा भगवंताने आपले रूप दाखविले ते पाहून अक्रुराचे शरीर पुलकित झाले, आपण ज्यांची काळजी करतो तेच पूर्ण विश्वाची काळजी करणारे प्रत्यक्ष भगवंत आहेत हे पाहून त्यांना परमानंद झाला. त्यांच्यात परमभक्तीचा उदय होऊन त्यांनी भगवंतांना वंदन केले व त्या बालकांच्या सुरक्षेप्रती ते निश्चिंत झाले. अक्रुराने मथुरेत गेल्यावर कृष्ण, बलरामांना घरी येण्याची विनंती केली. मात्र आपण प्रथम मथुरा फिरून व शत्रूंना ठार करून नंतरच आपल्याकडे येऊ असे सांगितले व कंसाचा वध केल्यानंतर बलराम, कृष्ण अक्रुराकडे गेले.
हस्तिनापुरात पंडूच्या मृत्यूनंतर धृतराष्ट्र राजा झाला. तेव्हा पांडवांची काय स्थिती आहे हे पाहण्यासाठी व पांडवांचे क्षेम कुशल विचारण्यासाठी श्रीकृष्णाने अक्रुराला आपला दूत म्हणून हस्तिनापूरला पाठविले. अक्रुराने हस्तिनापूरला जाऊन कुंती व पांडवांची भेट घेतली, कुंतीने त्यांना आपली पूर्ण स्थिती सांगितली. अक्रुराने धृतराष्ट्राशी सल्लामसलत करून त्यांना राजधर्म पाळून कौरव, प्रजा व पंडू पूत्रांशी समानतेने वागण्याचा सल्ला दिला व परत येऊन श्रीकृष्णाला सद्यस्थिती सांगितली.
स्यामंतक मणी चोरी प्रकरणात प्रसेनजिताला मारून वाघाने त्याच्या गळ्यातील मणी पळविला पुढे जांबुवंताने वाघाला मारून तो मणी आपल्या गुहेत नेला. मात्र मणीच्या चोरीचा आळ कृष्णावर आला तेव्हा कृष्णाने जांबवंताशी युद्ध करून जांबुवंताकडून मणी आणून सत्रजीताला दिल्यानंतर शतधन्वाने सत्रजीताला ठार करून मणी पळविला व अक्रुराजवळ ठेवून स्वतः पळून गेला. अक्रूरही अन्यत्र गेले तेव्हा कृष्णाने दूत पाठवून अक्रुराला बोलावून सर्वांसमोर सत्य कथन करावयास लावून मणी परत अक्रूरला स्वतःजवळच ठेवण्यास दिला.
प्रभास तीर्थक्षेत्रावर झालेल्या यादवाच्या अंतर्गत यादवीत सर्व यादवांचा नाश झाला.