खरे तर बदलांचा स्वीकार करणे याला खूप चांगला इंग्रजी शब्द आहे ऍडॉप्शन! आपण कितीही मनात आणले तरी आपल्याला हवे तसे कधीच घडत नसते. त्यामुळे जे काही घडत आहे तसे परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजे बदललेल्या किंवा आव्हानात्मक परिस्थितीला भावनिक आणि मानसिकदृष्ट्याही मनाचे संतुलन टिकवून ठेवून, आहे तसेच स्वीकारणे आणि मग त्यातूनच मार्ग काढणे म्हणजे बदलांचा स्वीकार! संतुलित राहून स्वीकारणे, तसेच त्यातून मार्ग काढणे होय!
ही एवढी कठीण व्याख्या तुम्हाला सांगण्यामागचे कारण म्हणजे आज दिवाळीची पहिली अंघोळ करून मी दारापुढे रांगोळी काढत होती आणि माझी मदतनीस वैभवी माझ्या मागे उभे राहून कौतुकाने रांगोळीकडे पाहत होती. माझी तंद्री भंगली आणि मी तिच्याकडे वळून पाहून विचारले, “कधी आलीस गं?” “आत्ताच.” ती उत्तरली. “कमाल आहे बाई तुझी. तुला आज शांतपणे उभं राहायला बरा वेळ मिळाला?” हे मी विचारताक्षणी ती हसून म्हणाली, “होय मिळतो कधीकधी.”
तिच्याशी बोलता बोलता मी दोन बश्या काढल्या आणि त्यात दिवाळीचा फराळ भरायला सुरुवात केली. लाडू ताटात ठेवले होते आणि मी चिवडा टाकायला गेल्यावर तिने मला विचारले, “आणि दुसरी ताटली माझ्यासाठी का?” म्हटले “हो.” तर म्हणाली, “मी एक घास पण खाणार नाही.” मी चिडून विचारले, “आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. माझ्या घरी तोंड नाही का गोड करणार?” तर म्हणाली, “आज आमची दिवाळी पार्टी होती.” म्हटले, “कुठे इतक्या सकाळी सकाळी पार्टी?” तर म्हणाली, “ट्रेनमध्ये!” मला नवल वाटले. मी तिला त्याच्याविषयी अधिकची माहिती विचारली. “आम्ही आज सर्व ठरवून दिवा स्टेशनला ‘लेडीज स्पेशल’मध्ये चढलो. तसा आमचा हा नेहमीचा डबा. चढताक्षणी आतमध्ये आणि खिडकीत बाहेरूनसुद्धा तो डबा तोरणाने सजवलेला होता ते पाहून आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. आमच्यातल्या काही मैत्रिणी दिव्याहून उलट्या दोन स्टेशन मागे गेल्या आणि त्यांनी हे तोरण वगैरे लावले होते. गप्पागोष्टी करत असतानाच ठाणा स्टेशन आले आणि तिथे एक मुलगा गरम गरम वडापाव घेऊन चढला. त्याला आदल्या दिवशीच फोन करून ऑर्डर दिलेली होती. दिवा स्टेशनपासूनच आम्ही पेपरच्या ताटल्या भरायला सुरुवात केली होती. कोणीतरी त्याच्यात ढोकळा ठेवत होते तर कोणी एक बंुदीचा लाडू. ठाणा स्टेशनवर चढलेल्या मुलाने त्यात वडापाव ठेवला आणि भराभर ट्रेनच्या डब्याच्या या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ताटल्या गेल्या. तोपर्यंत मोठाल्या पिशवीतून आमच्या काही मैत्रिणींनी आणलेल्या कोल्ड्रिंकचे कागदी डबे सगळ्यांपर्यंत पोहोचले. आम्ही गप्पागोष्टी करत घाटकोपर स्टेशन येईपर्यंत सर्व खाद्यपदार्थ संपवले. हळूहळू घाटकोपर, विद्या विहार, कुर्ला येथे उतरायला सुरुवात केली.
मी आश्चर्याने विचारले, “पण ट्रेनमध्ये तर खूप लोक चढतात ना?” “तशा नेहमीच्याच आम्ही बाया परंतु चार-दोन जर बिनओळखीच्या चढल्या तरी आम्ही त्यांना या कागदी ताटल्या देतोच!” मी विचारले, “कसे परवडते तुम्हाला?” तर ती म्हणाली तशी आम्ही दोन दिवस आधीच तीस रुपये वर्गणी काढलेली होती. त्यामुळे दोन-चार वडापाव आम्ही एक्स्ट्रा मागवतोच!”
तिचा आनंद ओसंडून वाहत होता. तिच्या नवीन ड्रेसकडे पाहून मी त्याचेही कौतुक केले आणि सरकन एक वर्षापूर्वीच्या आम्हा दोघींमधील संवाद मला आठवून गेला. मी तिला ‘पुरणपोळी करशील का?’ विचारले तर ती चिडून सरळ ‘नाही’ म्हणाली. इतकंच काय तर कधी मी तिला सकाळी ८ ला बोलवायची तर ती सहज यायची पण ती ‘शक्यच नाही’ म्हणायला लागली आणि मला कळले की ती चेंबूर सोडून दिव्याला राहायला गेली आहे ! रोज कंटाळलेली चिडलेली असायची कारण दोन ट्रेन बदलून इतका दूरचा प्रवास करून येण्याची तिला कधीच सवय नव्हती.
“आम्ही मैत्रिणी ट्रेनच्या दाराजवळ मांडी घालून बसतो, तर तुमच्यासारखे ऑफिसमध्ये जाणाऱ्या बायका आम्हाला ‘दारात का बसली?’ म्हणून ओरडतात. मग एक दिवशी मी त्यांना म्हटले की तुम्हा लोकांना ऑफिसला जायचं असतं. तुम्हाला व्यवस्थित बेंचवर बसायला जागा मिळावी म्हणून आम्ही खाली दारात बसतो कारण आम्ही कामवाल्या आहोत. तुम्ही जसे सकाळी बाहेर पडता तसे आम्हीही बाहेर पडतो आणि तुम्ही जसे संध्याकाळी घरी परतता तसे आम्हीही परततो. तुमच्याइतकीच आम्हालाही बसून प्रवास करायची आवश्यकता आहे.”
तिच्याकडून नवीन नवीन गोष्टी कळत होत्या म्हणजे जेव्हा चेंबूरवरून ती आमच्या घरी यायची तेव्हा तिच्या कानात सोन्याचे एकच डूल कमीत कमी दहा वर्षे मी पाहत होते पण अलीकडे ती अगदी नवनवीन कानातले घालायची. वेगवेगळी मंगळसूत्रं घालायची. बांगड्यांचे कितीतरी प्रकार तिच्या हातावर दिसून यायचे. चांगला ड्रेस आणि त्यावर व्यवस्थित ओढणी घालूनच ती अलीकडे यायची.
फारशी शाळा न शिकलेली, घराजवळच्याच मुलाशी व्यवस्थित ठरवून लग्न झालेली ही माझी मदतनीस चेंबूरच्या घराचे भाडे परवडेना म्हणून गावची शेती विकून, घरादारातील सोने गहाण ठेवून दिव्याला स्वतःच्या मालकीच्या घरी राहायला गेलेली.
नवीन घर, चांगले शेजारी, ट्रेनमध्ये भेटलेल्या या व्यवस्थित राहणाऱ्या नवीन मैत्रिणी त्यामुळे चांगल्या चप्पल, चांगली बॅग आणि चांगले कपडे घालून येणारी माझी ही मदतनीस जिने परिस्थितीशी छान जुळवून घेतल्याचे माझ्या लक्षात आले. आज दिवाळीच्या दिवशी ‘दिवाळी पार्टी’नंतरचा तिचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. माझ्या लक्षात आले की जेव्हा परिस्थिती सतत बदलत असते तेव्हा या बदलत्या परिस्थितीशी आपल्याला जुळवून घेता आले पाहिजे तरच आपण सुखी होऊ शकतो! म्हणूनच आपल्यावर जशी वेळ येईल तसे त्या वेळेचे स्वागत करा आणि परिस्थितीशी जुळवून घ्या. बदलांचा स्वीकार हाच आपल्या जीवनाला देईल नवीन आकार!






