Saturday, October 25, 2025
Happy Diwali

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास त्याचे आंदोलन सुरू होते. विधान भवनाबाहेरील झाडावर चढून आज सकाळी या व्यक्तीने दोन तास आंदोलन केले. ‘वाहतूक पोलिसांनी दंड केल्याने मी जीव देण्यासाठी झाडावर चढलो’, असे तो सांगत होता. अखेर कफ परेड पोलिसांनी झाडावर चढून समजूत काढून त्याला खाली उतरवले. तो नशेत असल्याचे वायफळ बडबड करीत होता, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी त्याची अधिक चौकशी करण्यात येत आहे.

विधान भवनाबाहेर शनिवारी सकाळी अचानक गोंधळ सुरू झाला. सकाळी १० वाजता एक इसम झाडावर चढून बसला होता. मी वरून उडी मारून जीव देईन असे तो वारंवार सांगत होता. ते पाहून बघ्यांची गर्दी जमली. तो खाली उतरायला तयार नव्हता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तो काय बोलत होता हे समजत नव्हते. पोलीस त्याला खाली येण्यासाठी विनवणी करीत होते. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस झाडावर चढू लागताच तो उडी मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे पेच निर्माण झाला होता.
हा पेच सोडवायचा कसा, असा प्रश्न पोलिसांना पडला होता. पोलीस त्याला समजावून दमदाटी करून थकले. शेवटी कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड त्याच्या कलाने घेत झाडावर चढले. त्याच्याशी प्रेमाने बोलू लागले. तुझी अडचण दूर करू, तुझी मागणी पूर्ण करू असे सांगत त्यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो वायफळ बडबड करीत होता. माझ्यावर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली, मराठी माणसांना स्टॉल्स लावू देत नाही, असे तो सांगत होता. मात्र गायकवाड यांनी चातुर्याने समजूत घालून त्याला खाली आणले. तो खाली येतात त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान हे नाट्य सुरू होते.
Comments
Add Comment