पॅरिस : जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे घडलेल्या चोरीने जगभरात खळबळ उडाली आहे. सकाळी संग्रहालय उघडलेलं असताना आणि पर्यटकांची गर्दी सुरू झाली असतानाच, काही चोरट्यांनी फक्त ८ मिनिटांत शाही दागिने चोरून नेले. ही चोरी फ्रान्ससाठी सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहे, कारण लुटलेले दागिने फ्रेंच राजघराण्याशी आणि १९व्या शतकातील ऐतिहासिक वारशाशी निगडीत आहेत.
चोरी संग्रहालयाच्या आग्नेय भागातील ‘गॅलरी ऑफ अपोलो’ मध्ये घडली. ही गॅलरी फ्रेंच राजघराण्याचे ऐतिहासिक दागिने आणि रत्नजडित अलंकार साठवण्यासाठी वापरली जाते.
सकाळी ९ वाजता पर्यटक मोनालिसा आणि इतर कलाकृती पाहण्यासाठी आत येत होते, त्याचवेळी चार जणांच्या टोळीतले दोन जण यांत्रिक शिड्या वापरून खिडकीतून आत शिरले. त्यांनी अँगल ग्राइंडर वापरून धातूच्या पेट्या उघडल्या आणि दागिने चोरण्यास सुरुवात केली. CCTV फुटेजनुसार, संपूर्ण चोरीला फक्त ३ मिनिटे ५७ सेकंद लागली.
चोरांनी एकूण ८ मौल्यवान दागिने चोरले आहेत. त्यात राणी हॉर्टेन्स आणि राणी मरी अमील तृतीय यांचे टियारा, हार आणि कानातले; नेपोलिअन बोनापार्टने पत्नी मरी लुईसला भेट दिलेला पाचूचा हार आणि कानातले; तसेच महाराणी यूजीन तृतीय यांचा मोती व हिऱ्यांचा टियारा आणि ब्रूच यांचा समावेश आहे. फ्रान्सच्या मंत्र्यांच्या मते, या दागिन्यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्य आर्थिक मूल्यापेक्षा जास्त आहे.
चोरी केल्यानंतर चोरांनी शिड्या जाळण्याचा प्रयत्न करून Yamaha TMAX स्कूटरवरून पळ काढला, जीचा ताशी वेग १६० किलोमीटरपेक्षा जास्त होता. पोलिसांच्या अंदाजानुसार, चोर A6 महामार्गाच्या दिशेने दक्षिणेकडे गेले. त्यांनी मागे काही उपकरणे आणि हाय-व्हिजिबिलिटी जॅकेट टाकले, ज्यावरून तपास सुरू आहे.
संग्रहालयाचे नियंत्रण कक्ष आणि सुरक्षारक्षक यंत्रणा चोरी रोखू शकल्या नाहीत, पोलिस आता या धाडसी चोरीचा तपास करीत आहेत. ही घटना फ्रान्ससाठी सांस्कृतिकदृष्ट्या मोठा धक्का मानली जात आहे, कारण या दागिन्यांचा इतिहास नेपोलिअन आणि फ्रेंच राजघराण्याशी निगडीत आहे.






