Saturday, October 25, 2025
Happy Diwali

सिंधुदुर्गचे एआय मॉडेल राष्ट्रीय पातळीवर; नीती आयोग दोन दिवस करणार अभ्यास, पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

सिंधुदुर्गचे एआय मॉडेल राष्ट्रीय पातळीवर; नीती आयोग दोन दिवस करणार अभ्यास,  पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

सिंधुदुर्ग : देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणाली स्वीकारणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जात आहे. या अद्वितीय मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाने पुढाकार घेतला असून, आयोगाचे शिष्टमंडळ येत्या ३०आणि ३१ऑक्टोबर रोजी दोन दिवसांच्या दौऱ्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमीसे, अप्पर पोलीस अधिक्षक नयोमी साटम आदी उपस्थित होते.

मंत्री नितेश राणे म्हणाले, नीती आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या एआय प्रणाली सिंधुदुर्ग मॉडेल बनली आहे त्याचा सखोल अभ्यास या दोन दिवसांच्या दौऱ्यात केला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून विविध शासकीय विभागांमधील कार्यप्रणाली अधिक परिणामकारक करण्याचा प्रयत्न केला आहे.

मार्व्हल कंपनीच्या माध्यमातून चालवली जाणारी ही एआय प्रणाली १ मे २०२५ पासून कार्यरत झाली आहे. आरोग्य, पोलीस, आरटीओ, जिल्हा परिषद तसेच अन्य विभागांमध्ये एआय प्रणालीचा वापर सुरू झाल्यानंतर प्रशासनिक कामकाजात झालेला सकारात्मक बदल, त्यातील आव्हाने आणि उपाययोजना यांचा सविस्तर आढावा नीती आयोगाचे अधिकारी घेणार आहेत.

या दोन दिवसांच्या दौऱ्यात सर्व विभागप्रमुख आपल्या विभागात एआयच्या माध्यमातून झालेल्या बदलांची आणि सुधारणा उपक्रमांची माहिती सादर करणार आहेत. ग्रामीण भागातील जिल्हा भविष्यात एआय-सक्षम जिल्हा कसा बनू शकतो, हे सिंधुदुर्ग मॉडेलद्वारे नीती आयोग समजून घेणार आहे. नीती आयोग हे थेट पंतप्रधान कार्यालयाला रिपोर्ट करणारे आणि देशाच्या आर्थिक व विकासात्मक नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारी केंद्र सरकारची मुख्य संस्था आहे. त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी सिंधुदुर्गच्या एआय उपक्रमाचा अभ्यास करणार आहेत, ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानाची आहे.

या संदर्भात शनिवारी जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक झाली असून, मंत्रालयातही याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाबाबत जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तसेच राज्याचे मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारीही या उपक्रमावर लक्ष ठेवून आहेत. ३० व ३१ ऑक्टोबर हे दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील एआय युगाचे सुवर्णपान ठरणार आहेत.

नीती आयोग ३० ऑक्टोबर, सकाळी १० वाजल्यापासून ते ३१ ऑक्टोबर, सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात असणार आहे. जिल्ह्याने विकासासाठी एआय तंत्रज्ञानाचा कसा यशस्वीरित्या उपयोग केला आहे, याचे निरीक्षण आणि विश्लेषण करणार आहे. 'सिंधुदुर्ग मॉडेल'ची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने विविध सरकारी खात्यांमध्ये एआयचा अवलंब करून प्रशासकीय कार्य प्रणालीत क्रांती घडवून आणली आहे. या मॉडेलला राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी नीती आयोग हा अभ्यास करत असल्याचेही पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा