मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने टॅबची खरेदी केली जात आहे. महापालिकेच्या शाळांमधील इयत्ता ९वीच्या तब्बल १९ हजार ३१७ विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात येणार आहे. मराठी. उर्दू, हिंदी. इंग्रजी या चार माध्यमांच्या विद्यार्थ्यांंसाठी हे टॅब एक वर्ष अधिक चार वर्षाच्या ज्यादा हमी कालावधीसाठी खरेदी करण्यात येत आहेत. या टॅबच्या खरेदीसाठी स्किल कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली असून या कंपनीकडून टॅबच्या खरेदीसह ई कंटेंट तसेच चार वर्षांची देखभाल आदींकरता एकूण ४९ कोटी १९ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.
मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने शालेय विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी व बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षण देण्याच्या दृष्ट्रीकोनातून सन २०१५-१६ मध्ये टॅब देण्याची योजना राबवली होती. त्यानंतर सन २०१६-१७, सन २०१७-१८ आणि सन २०२१-२२ मध्ये विद्यार्थ्यांना टॅब देण्याची योजना राबविली होती. इयत्ता ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी सन २०१७-१८ मध्ये १८०७८ टॅब देखभालीसह खरेदी करण्यात आले होते. त्यामुळे फेब्रुवारी २०१८ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत या टॅबचे देखील आयुष्यमान संपलेले आहे. यास्तव सन २०२५-२६ या वर्षात इयत्ता ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी १९ हजार ३१७ नवीन टॅब खरेदी करण्यात येत आहे.
कलांचा आस्वाद घेत रसिकही दाद देऊन एकप्रकारे त्या कलाकृतीला पूर्णत्वच देत असतो. सगळेच कलाकार होऊ शकत नाहीत पण आस्वादक, रसिक मात्र नक्कीच होऊ शकतात. ...
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतून प्रवेश घेणारे बहुसंख्य विद्यार्थी हे आर्थिदृष्ट्या दुर्बल समाजघटकांतून आलेले असतात. या विद्यार्थ्यांना कुटुंबाच्या रोजच्या गरजा भागविण्यासाठी आपले आईवडील वा पालक यांच्या नोकरीत किंवा उद्योगधंद्यामध्ये हातभार लावावा लागतो. अशा परिस्थितीत शिक्षणाचा खर्च कुटुंबास परवडणारा नसल्याने या विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागते. परिणामी शाळांद्वारे होऊ शकणाऱ्या बौध्दीक क्षमता विकसित होण्यास अडचणी निर्माण होतात तसेच आर्थिक उन्नतीचा मार्ग खुंटतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी टॅबची गरज असल्याने त्यादृष्टीकोनातून ही योजना राबवली होती,याला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामध्ये टॅब वापराबाबत शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. टॅबची एकूण संख्या : १९, ३१७
टॅबची किंमत : १५५५० रुपये
टॅब ई कंटेट : १९७० रुपये
चार वर्षांचे प्रत्येकी देखभाल आणि इं कंटेट : प्रती वर्षी ६०५ रुपये






