Saturday, October 25, 2025
Happy Diwali

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, प्रशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, प्रशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

सातारा : साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. या डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर नावाच्या तरुणावर मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला होता. त्यावरून पोलिसांनी प्रशांत बनकराला अटक केली आहे. पण प्रशांतच्या बहिणीने गंभीर आरोप डॉक्टर तरुणीवरच केले आहेत.

प्रशांत बनकरच्या बहिणीचा दावा

प्रशांतच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार, डॉक्टर तरुणीनेच तिच्या भावाला लग्नासाठी विचारणा केली होती. मात्र प्रशांतने याला स्पष्ट नकार दिल्यानंतर त्या मानसिकरीत्या अस्वस्थ झाल्या. नोकरीच्या ठिकाणी कायम मोठ्या तणावाखाली वावरत असल्याचेही डॉक्टर तरुणी वारंवार सांगत होती, असंही प्रशांतच्या बहिणीने सांगितलं. डॉक्टर आणि प्रशांत यांच्यात नियमित संपर्क होताच. अगदी मृत्यूच्या आधीपर्यंतही त्या त्याला वारंवार फोन करत होत्या, असा खुलासा प्रशांतच्या बहिणीने केला आहे.

फोटोवरून किरकोळ वाद

दिवाळीच्या काळात दोघांमध्ये एका फोटोवरून किरकोळ वाद झाल्याचंही समोर आलं आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फोटो नीट काढला नाही म्हणून डॉक्टर तरुणीने प्रशांतवर आवाज चढवला, त्यावर प्रशांतनेही उलट उत्तर दिलं. त्या घटनेनंतर डॉक्टर सतत तू माझ्याशी असं का बोलतोस म्हणत भावाला मानसिक त्रास देत होत्या, असा आरोप बहिणीने केला. प्रशांतने वारंवार माफी मागून विषय संपवण्याचा प्रयत्न केला, तरी त्या सतत संपर्क करत होत्या, असं ती म्हणाली.

प्रशांतच्या बहिणीने आणखी एक महत्त्वाचा दावा केला की, डॉक्टर तरुणी आमच्या घरात घरच्यांसारखी ये-जा करायची. दोन्ही कुटुंबीय मिळून देवदर्शनालाही गेले होतं. प्रशांत आजारी असताना डॉक्टर तरुणीशी ओळख झाली होती आणि त्यानंतर संबंध अधिक जवळचे झाले. बनकर कुटुंबीयांनी पोलिसांना या संबंधातले काही पुरावे सादर केले आहेत.

या सर्व उलट खुलाशांमुळे फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं झालं आहे. एका बाजूला डॉक्टरच्या सुसाईड नोटमधील आरोप आणि दुसऱ्या बाजूला बनकर कुटुंबीयांचे दावे या दोन्हींच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >