१५ सप्टेंबर १९९० रोजी कोकण रेल्वेमार्गाच्या कामाची पायाभरणी रोहा येथे करण्यात आली. प्रत्यक्षात २६ जानेवारी १९९८ रोजी कोकण रेल्वेसेवा सुरू झाली. या सेवेला आता २७ वर्षे पूर्ण झाली; परंतु कोकण रेल्वे महामार्गाचा विचार करता अजूनही कोकण रेल्वे महामार्गावरील स्थानकातील काही फलाटांची उंची वाढवण्यात आलेली नाही. ही अपघाताची धोक्याची घंटा आहे. तेव्हा रेल्वे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक रेल्वे स्थानकातील फलाटांची उंची रेल्वे गाडीच्या दरवाजाइतकी समान असावी. म्हणजे गाडीत चढता- उतरताना प्रवाशांना त्रास होणार नाही. तेव्हा रेल्वे प्रशासनाला जागरूक करून प्रवाशांचा प्रवास सुखद होण्यासाठी केलेला एक प्रयत्न.
एका बाजूला अरबी समुद्र, दुसऱ्या बाजूला पश्चिम घाट, नद्या-नाले, डोंगर-दऱ्या आणि घनदाट जंगल त्यामुळे अशक्य वाटणारे शक्य झाल्याने कोकणातील चाकरमानी आपल्या गावी सकाळी जाऊन रात्री मुंबईला परत येऊ शकतो. हे फक्त आणि फक्त कोकण रेल्वे महामार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे शक्य झाले आहे. तेव्हा असे जरी असले तरी रेल्वे गाड्यांचा दरवाजा व रेल्वे फलाटांची उंची समान असणे आवश्यक आहे. भविष्यात दुहेरी वाहतूक होणार हे मात्र नक्की असले तरी कोकण रेल्वे महामार्गावरील रेल्वे स्थानकांचा विचार केल्यास ठरावीक स्थानके सोडली तर अजूनही काही ठिकाणी फलाटांची उंची वाढविण्यात आलेली नाही. ती अजूनही रेल्वे रूळाइतकीच आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना हकनाक त्रास सहन करावा लागतो. तेव्हा दुहेरी वाहतूक होण्याला काही काळ असला तरी प्रत्येक रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे थांबते. याला जलद गाड्या अपवाद आहेत. त्या ठरावीक रेल्वे स्थानकात थांबतात. तेव्हा प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक रेल्वे स्थानकातील फलाटांची उंची रेल्वे दरवाजाइतकी वाढविणे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कोकणात रेल्वेसेवा सुरू होऊन आता जवळजवळ २७ वर्षे झाली; परंतु अजूनही काही रेल्वे स्थानकावर फलाट तयार करण्यात आलेले नाही. वास्तविक रेल्वे स्थानक म्हटले की रेल्वे स्थानकावर गाडीच्या लांबीचे फलाट बांधणे आवश्यक आहे. ते सुद्धा रेल्वे दरवाजाच्या उंची बरोबर असले पाहिजेत. कारण ही रेल्वे स्थानकाची मूलभूत गरज आहे. रेल्वे ही प्रवाशांच्या सेवेसाठी असते तेव्हा प्रवाशांना उत्तम प्रकारे सेवा मिळालीच पाहिजे. त्यासाठी रेल्वे फलाटांची उंची रेल्वे दरवाजाच्या उंचीइतकी असायला हवी. म्हणजे गाडीमध्ये प्रवाशांना चढता किंवा उतरतांना त्रास होत नाही; परंतु फलाटाची उंची गाडीच्या दरवाजाइतकी नसल्याने वृद्ध व्यक्ती, अपंग व्यक्ती, लहान मुले आणि गरोदर महिला यांना गाडीत चढणे किंवा उतरणे शक्य होत नाही. तसेच आजारी व्यक्ती व जड सामान नेणे अवघड असते. अशा अनेक कारणासाठी रेल्वे दरवाजा इतकी उंची रेल्वे फलाटाची असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे गर्दीच्या वेळी खाली उतरताना धक्काबुक्की झाल्यास प्रवाशांना इजा होण्याची शक्यता असते. म्हणजे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून प्रवास करणे व फलाट नसणाऱ्या रेल्वे स्थानकात उतरणे धोकादायक आहे. तरी कोकणी माणसात आपापसात हेवेदावे जरी असले तरी प्रवासात एकमेकांना समजून घेतात. रेल्वेत शिरले काय समोरच्या व्यक्तीला आपुलकीने विचारणार काय हो, खय उतरणार? त्याचा स्टेशन समजला काय त्यांचे गजाली सुरू होतले. अगदी रेल्वे गाडीतून उतरापर्यंत. असो..! मनमिळावू कोकणी माणूस आसा.
तेव्हा कोकणात रेल्वे सुरू झाल्याने लालपरीपेक्षा कमी तिकीट व आरामदायी प्रवास असल्याने कोकणी माणूस सर्रास रेल्वेने प्रवास करणे जास्त पसंत करतात. त्यामुळे लालपरीकडे कोकणी माणूस पाट फिरवू लागला आहे. मात्र लालपरी चालली पाहिजे म्हणून काही चाकरमानी लालपरीने आपल्या गावी येणे-जाणे करणे पसंत करतात. उन्हाळी सुट्टी, गणेश चतुर्थी व नाताळ या मोसमात तर रेल्वे गाडीने जाऊच नये असे वाटते. कारण तिकीट जरी आरक्षित केलेले असले तरी गाडीत चढणे कठीण असते. मागील उन्हाळ्यात जाताना माझा एक मित्र सांगत होता की, मी स्लीपरचे तिकीट काढले होते. दादरला कोकण रेल्वेत कसाबसा चढलो. मात्र माझ्या जागेपर्यंत जाण्यासाठी रत्नागिरी उजाडली. म्हणजे प्रवाशांचे गर्दीच्या वेळी किती हाल होतात याची कल्पना येते. तो सुद्धा रात्रीचा प्रवास हे विसरून चालणार नाही. मग गर्दीच्या वेळी फलाट नसलेल्या स्थानकात कशाप्रकारे प्रवाशांचे हाल होत असतील याचे वर्णन न केलेले बरे. तेव्हा अशा विविध घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने अर्थात रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवाशांचे हित लक्षात घेऊन ज्या रेल्वे स्थानकात फलाट नाहीत ते प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व रेल्वे प्रशासनाच्या हितासाठी तातडीने बांधून घेणे गरजेचे आहे. तेव्हा कोकण रेल्वे महामार्गावर ज्या रेल्वे स्थानकातील फलाटांची उंची वाढवावी अशी स्थानिक नागरिकांची किंवा रेल्वे प्रवाशांची मागणी असेल त्या रेल्वे स्थानकातील फलाटांची उंची त्वरित वाढविण्यात यावी. त्यासाठी संबंधित रेल्वे स्थानकातील फलाटांचे प्रस्ताव तयार करून रेल्वे मंत्रालयाकडे सादर करणे गरजेचे आहे.
- रवींद्र तांबे






