Saturday, October 25, 2025
Happy Diwali

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसला आहे. कोकणातील लोककला दशावतारावर आधारित असलेल्या या सिनेमाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर परदेशातील मराठी प्रेक्षकांनाही भुरळ घातली आहे. प्रदर्शित होऊन सात आठवडे उलटले तरीही राज्यातील अनेक थिएटरमध्ये हा सिनेमा हाऊसफुल दाखवला जात आहे. आतापर्यंत चित्रपटाने २४ कोटी रुपयांहून अधिकची कमाई करत विक्रमी यश संपादन केले आहे.

‘दशावतार’च्या यशानंतर आता हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी जाहीर केले की, हा सिनेमा मल्याळम भाषेत डब करून केरळमध्ये २१ नोव्हेंबरपासून प्रदर्शित होणार आहे.

खानोलकर यांनी सोशल मीडियावर लिहिले, “चित्रपटाला भाषेचं बंधन नसतं! मराठी प्रेक्षकांनी ‘दशावतार’वर अपार प्रेम केलं, आणि आता आम्ही तोच अनुभव केरळच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत.”

या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी ‘बाबुली मेस्त्री’ या दशावतारकलेला जीवन अर्पण केलेल्या कलावंताची भूमिका साकारली आहे. बाबुलीच्या शेवटच्या प्रयोगादरम्यान घडणारी अघटित घटना आणि त्यानंतर घेतलेले निर्णय यामुळे कथा प्रेक्षकांना खोलवर भिडते. प्रभावळकर यांच्या अभिनयाने पात्र जिवंत केले असून तेच या चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरले आहे.

चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले असून, गुरू ठाकूर यांनी संवाद व गीतलेखन केले आहे. ए. व्ही. प्रफुलचंद्र यांच्या संगीताने कथेला भावपूर्ण स्पर्श दिला आहे. निर्मिती सुजय हांडे, ओंकार काटे आणि सुबोध खानोलकर यांनी केली आहे.

‘दशावतार’मध्ये दिलीप प्रभावळकर यांच्यासह महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, रवी काळे, अभिनय बेर्डे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर, लोकेश मित्तल आणि कोकणातील अनेक स्थानिक कलाकार झळकले आहेत.

कोकणातील पारंपरिक दशावतार कलेवर आधारित हा चित्रपट केवळ एका कलावंताच्या संघर्षाची कहाणी सांगत नाही, तर तो मराठी संस्कृतीचा आत्मा जिवंत करतो. लोककला, परंपरा आणि आधुनिक काळातील बदल यांच्या संघर्षातून उभी राहिलेली ही कथा प्रेक्षकांच्या मनाला खोलवर स्पर्श करते. महाराष्ट्रात विक्रमी यश मिळवल्यानंतर आता ‘दशावतार’ केरळच्या पडद्यावर मराठी कलात्मकतेचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या मल्याळम आवृत्तीमुळे महाराष्ट्राबाहेरही मराठी कलेचा आणि भावनांचा प्रभाव विस्तारेल, अशी चित्रपटसृष्टीत अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >