मुंबई : गायक संजू राठोड सध्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये यशाच्या शिखरावर आहे. प्रत्येक गाणे रिलीज होताच प्रेक्षकांमध्ये तो लोकप्रिय होत आहे. त्याच्या "काली बिंदी", "गुलाबी साडी", "शेकी शेकी" आणि "सुंदरी सुंदरी" सारख्या गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. परंतु, "सुंदरी" गाण्यावर नुकतेच एका इन्स्टाग्राम युझरने कॉपी केल्याचा आरोप केला. या आरोपामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
गाण्यावर कॉपीचा आरोप
इन्स्टाग्राम युझर रोनित महाले यांनी @7ronniet या अकाउंटवरून एक रील शेअर केली आहे. त्यात त्यांनी "सुंदरी" गाण्याची सुरुवात WWE सुपरस्टार जॉन सीनाच्या एंट्री थीम सारखी असल्याचा दावा केला. रोनितने दोन्ही गाणी ऐकवून तुलना करत संजू राठोडला टॅग करून विचारलं, “बरोबर ना?”
View this post on Instagram
रोनितच्या या पोस्टवर अनेक युझर्सनी प्रतिक्रिया दिल्या, पण कोणीही त्याच्याशी सहमत नसल्याचे दिसून आले. लोकांनी दोन्ही गाणी वेगवेगळ्या स्वरूपात असल्याचे स्पष्ट केले. एका युझरने लिहिले, "कोणत्याही संगीतकाराला विचारले तर तो सांगेल की ही म्युझिक कॉपी केलेले नाही." दुसऱ्या युझरने लिहिले, "जा रे, संजू राठोडवर जळू नको," तर आणखी एका युझरने कमेंट केली, "काहीच जुळत नाहीय. हे शक्यच नाही."
रोनित महालेने संजू राठोडवर संगीत चोरीचा आरोप तर केला, पण सोशल मीडियावर या आरोपाचा टिकाव लागला नाही. संजूने या विषयावर अजून स्पष्टीकरण दिलेले नसले तरी चाहत्यांनी आधीच हा वाद संपवला असल्यामुळे, रोनितचा प्रयत्न अपयशी ठरला असेच म्हणावे लागेल.






