Saturday, October 25, 2025
Happy Diwali

महाराजांच्या किल्ल्याची विटंबना! सिगारेट, दारूच्या बाटल्या आणि कंडोम आढळल्याने शिवप्रेमी आक्रमक

महाराजांच्या किल्ल्याची विटंबना! सिगारेट, दारूच्या बाटल्या आणि कंडोम आढळल्याने शिवप्रेमी आक्रमक

जंजिरे धारावी किल्ल्यावर कचऱ्याचा आणि अश्लीलतेचा विळखा; दुर्गप्रेमींचा प्रशासनावर संतापाचा 'बुलडोझर'

'आंदोलन छेडणार' - किल्ला जतन समितीचा थेट इशारा

भाईंदर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाची विटंबना! भाईंदर पश्चिमेकडील महत्त्वाचा जंजिरे धारावी किल्ला सध्या दारूच्या बाटल्या, सिगारेट पाकिटे आणि कंडोम सारख्या अश्लील कचऱ्याचे केंद्र बनला आहे. किल्ल्याची झालेली ही दयनीय अवस्था आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष पाहून दुर्गप्रेमी आणि शिवभक्तांचा संताप शिगेला पोहोचला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जंजिरे धारावी किल्ला जतन समितीने नुकतीच किल्ल्याच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी समोर आलेल्या विदारक दृश्याने शिवप्रेमींच्या भावनांना मोठा धक्का बसला. किल्ल्याच्या परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे, कंडोम कव्हर्स आणि इतर अस्वच्छ वस्तूंचा ढीग आढळला.

प्रशासनावर टीकेची झोड

ज्या किल्ल्यावर दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो, त्याच किल्ल्याची ही दुर्दशा पाहून शिवप्रेमींनी प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केवळ कार्यक्रम करणारे लोक, गडकिल्ल्यांच्या प्रत्यक्ष संवर्धनाकडे का दुर्लक्ष करतात?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. किल्ल्यावर रात्रीच्या वेळी लाईट बंद असल्याने अंधार असतो, अस्वच्छता आहे आणि सुरक्षारक्षकांचा अभाव आहे. त्यामुळेच हे ऐतिहासिक ठिकाण सध्या अयोग्य आणि गैरकृत्य करणाऱ्या तरुणांचे अड्डा बनले आहे.

वारंवार मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

जंजिरे धारावी किल्ला जतन समितीचे श्रेयस सावंत यांनी आरोप केला आहे की, समितीने यापूर्वीही मीरा-भाईंदर महानगरपालिका, स्थानिक आमदार आणि वारसा संवर्धन विभागाकडे किल्ल्यावर सुरक्षारक्षक नेमणे आणि वीजपुरवठा सुरू करणे अशा मूलभूत मागण्या केल्या होत्या. मात्र, प्रशासनाने या मागण्यांकडे अद्यापही अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाच्या या निष्क्रियतेविरोधात संतप्त झालेल्या जंजिरे धारावी किल्ला जतन समितीचे मयूर ठाकूर यांनी थेट इशारा दिला आहे की, “जंजिरे धारावी किल्ल्याच्या संरक्षण, स्वच्छता आणि सुरक्षेची योग्य व्यवस्था करण्यात आली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन छेडू.” हा किल्ला केवळ ऐतिहासिक वारसा नसून, शहराच्या संस्कृतीचा आत्मा आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या विषयाची गंभीर दखल घेऊन किल्ल्याचे संवर्धन करावे, अशी मागणी आता आक्रमकपणे जोर धरू लागली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >